कोहलीसमोर सलामीच्या फलंदाजांचा प्रश्‍न

0

कोलंबो । श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीसमोर दुसर्‍या कसोटीसाठी फलंदाजीचा क्रमाचा प्रश्‍न ऊभा ठाकला आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणार्‍या भारतीय संघाने गॉलेतील कसोटीत 304 धावांनी विजय मिळवत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात शिखर धवनने पहिल्या डावात 190 धावा केल्या. अभिनव मुकुंदने दुसर्‍या डावात 81 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार विराट कोहलीनेही दुसर्‍या डावात नाबाद 103 धावा केल्या होत्या.श्रीलंकेच्या दौर्‍यात भारताचे आघाडीचे चारही फलंदाज चांगलेच फॉर्मात आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणार्‍या कोलंबोतील कसोटी सामन्यात कोणाला संघाबाहेर ठेवायचे आणि कोणाला संधी द्यायची असा प्रश्‍न कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासमोर आहे.

शिखर धवन सुट्टीकरता मेलबर्नला जाणार होता. पण लोकेश राहुल आजारी पडल्याने त्याला बोलावण्यात आले. आता राहुल फिट झाला आहे. त्यामुळे धवन की राहुल असा पेच संघव्यवस्थापनला पडला आहे. विराट म्हणाला की, हा मोठा प्रश्‍न आहे. पण, कोणाला खेळवायचे, कोणाला नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. जो कोणी तिसरा खेळाडू असेल तो समजून जाईल की संघव्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. गाले कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करत 600 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर यजमान संघाला 291 धावांवर गुंडाळले होते. दुसर्‍या डावात भारतीय संघाने दिलेल्या 550 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावांवर आटोपला होता.