लंडन । भारतीय क्रिकेट संघाला आणि व्यवस्थापनाला लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे कमी दिसत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंड दौ-यावर गेलेल्या भारतीय संघात सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. खेळाडूंच्या वेतनासाठी बीसीसीआयशी पंगा घेणार्या कुंबळेच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याची माहिती मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 1 जूनपासून इंग्लंडच्या धर्तीवर सुरू होत असून सर्वांचे लक्ष रविवारी 4 जून रोजी होणार्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघातील हा वाद चिघळत असून संघासाठी फायदेशीर नसल्याचे चित्र आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर असणारे सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या वादामध्ये कुंबळे आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये समेट घडवून आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद भारताकडे कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले. संघकारा म्हणाला की, भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय मजबूत असून संघातील खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक आहे असे संगकाराने सांगितले. अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असे संगकाराने म्हटले आहे.
कोहलीची गांगुलीशीही चर्चा
बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यासंबंधी सल्लागार समितीला भेटून या वादावर चर्चा करणार आहेत. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यानंतर कर्णधार कोहलीने गांगुलीशी चर्चा केली. बीसीसीआयमधील एका गटाने कुंबळे यांना मुदतवाढ देण्याचे समर्थन केले आहे. पण कोहली कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ खेळण्यास इच्छुक नसल्याने मुदतवाढ मिळू शकली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर कुंबळे यांचा बीसीसीआय सोबतचा करार संपुष्टात येणार आहे. प्रशासकीय समिती संघाच्या दैनंदिन बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही. नवा प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सल्लागार समितीवर आहे. दरम्यान रवी शास्त्री हे खेळाडूंची जुळवून घेण्यात यशस्वी ठरले होते, अशी चर्चा देखील आहे.
भावनांना आवर घाला-केदार
1 जून पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून, भारताचा सलामीचा सामना 4 जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधली ही लढत नक्कीच चुरशीची होईल. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंवरही तितकाच दबाव असेल. तरीही इतर सामन्यांप्रमाणेच पाकविरुद्धचा सामना खेळला गेला पाहिजे. भावना बाजूला ठेवून आम्हाला खेळ करावा लागेल, असे भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज केदार जाधव याने सांगितले आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला भावनांना आवर घालता आला पाहिजे. भारत-पाक सामन्याला चाहते आवर्जुन उपस्थित राहतात हे खूप चांगलं आहे. , असे केदारने म्हटले आहे.