कोहली, पुजाराचे स्थान कायम राखले

0

दुबई । भारताच्या चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने नुकत्याच जाहिर करण्यात आलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजीतील आपले अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज लोकेश राहुलची एका क्रमांकाने घसरण झाली असून तो आता दहाव्या क्रमाकांवर आला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने अव्वल स्थानावरची पकड ढिली होऊ दिलेली नाही. स्टीव्ह पाठोपाठ इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांंमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने आपले अव्वल स्थान कायम राख ले आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजींमध्ये जेम्स एंडरसन दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजानंतर अश्‍विन, श्रीलंकेचा रंगाना हेराथ आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुडचा समावेश आहे. रविंद्र जडेजा (दुसर्‍या) आणि आर. अश्‍विन (तिसर्‍या) अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाच जणांमध्ये आहेत. या यादीत बांगलादेशाचा शाकिब अल हसन आघाडीवर असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील ऐतिहासीक विजयानंतर त्याने आपले स्थान आणखी बळकट केले आहे. अन्य खेळाडूंमध्ये वेस्टइंडिजचा क्रेग ब्रेथवेट आणि शाई होप्सने लीडस कसोटीतील शानदार कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीतले आपले सर्वोच्च स्थान मिळवले आहे.