कौटुंबिक तणावातून बक्सरच्या जिल्हाधिकाऱ्यांची आत्महत्या

0

नवी दिल्ली : बिहारमधील बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी कौटुंबिक तणावातूनच गाझीयाबाद रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनखाली आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. २९ वर्षाचा हा आयएएस अधिकारी गृहकलहांनी ग्रासलेला होता. त्यानेच आपल्या शेवटच्या व्हीडीओमध्ये कौटुंबिक कटकटींचे वर्णन केले आहे. कौटुंबिक तणावाने उमद्या अधिकाऱ्याचा बळी घेतला. तीन महिन्याच्या पोरीला पोरकं करून तो गेला. ‘कुटुंब वाचवा’ हा संदेश देणाऱ्या व हुंडाप्रतिबंधक 498अ कलमाच्या गैरवापराविरुद्ध लढणाऱ्या ‘सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन’ने रविवारी दिल्लीत जंतरमंतरवर कँडल मार्च काढून ही बाब उघड केली. भारतीय कुटुंब व्यवस्था वाचवण्यासाठी धडपणारी ही स्वयंसेवी संस्था या मृत्यूने हळहळली.

काय होतं त्या व्हिडिओत….
मुकेश पांडे म्हणतात, की माझे आईवडिल आणि बायको यांचं सारखं भांडण सुरू असतं. आईबाबा माझ्यावर अतिशय प्रेम करतात. इतकं प्रेम पण करू नये ना त्यांनी माझ्यावर. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच नाही का. पाच मिनिटांचा हा व्हीडीओ संवेदनशील माणसाचं हृदय पिळवटून टाकतो.

फाउंडेशनकडे अशा प्रकरणांचा ओघ…
सरकार मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन हेल्पलाईन पुरवित नाही. ‘सेव्ह इंडियन फाउंडेशन’कडे दरवर्षी १५ हजारांहून अधिक तरूण आईवडिल आणि बायकोच्या भांडणांनी तसेच वैवाहिक जीवनातील कटकटींना वैतागून येतात. या पैकी ५० टक्के तरूण आत्महत्येच्या विचारात असतात. दरवर्षी २२ हजार पुरूष कौटुंबिक कारणांनी आत्महत्या करतात. मानसशास्त्र तज्ज्ञ मात्र बऱ्याचशा आत्महत्या आर्थिक कारणांनी किंवा गरीबीने झाल्याचे कारण देतात. मुख्य कारणाला बगल दिल्यामुळे योग्य समुपदेशन होत नाही.

सेव्ह इंडियन फाउंडेशन काय करते…..
हुंडाप्रतिबंधक 498अ कलमाच्या गैरवापराविरुद्ध मदतीसाठी फाउंडेशनच्या हेल्पलाईन आहेत. त्यांचा व्हाटस अप ग्रुपही आहे. ओळख उघड न करताही फोनवर फाउंडेशनचे समुपदेशक मदत करतात. वेबसाईट – www.saveindianfamily.in/ ईमेल – asksiff@gmail.com माहितीसाठी मोबाईल – 8800844960(दिल्ली), 8892161190, 9650458787