पुणे : वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात 64 अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. इमारतीमधील प्रत्येक मजला, पार्किंग आणि लॉबी अशा प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बसविल्याने न्यायालयात गैरवर्तन करणार्यांवर आता एकाच ठिकाणाहून वॉच ठेवला जाणार आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 29 लाख 41 हजार 700 रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली होती. त्याअंतर्गंत हे काम करण्यात आल्याची माहिती दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा
अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली. नोव्हेबर अखेरीस हे सर्व सीसीटीव्ही सुरू झाले आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर विविध ठिकाणी, दोन मजली पार्किंगमध्ये, इमारतीमध्ये येण्याचा जागा आणि इतर सर्व आवश्यक ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालयात कोणताही गैरप्रकार झाल्यास त्यातील आरोपींना शोधणे सोपे होणार आहे, असे चांदणे यांनी सांगितले.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी त्यांच्या कमिटीने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. न्यायालयाच्या इमारतीमध्येच आत्तापर्यंत सुमारे दोन वकिलाला मारहाण करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. यातील एका प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद देखील दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला होता. त्याच्या आधी देखील अशीच घटना घडली होती. त्यामुळे न्यायालयात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी कवडे यांनी केली होती. दरम्यान सुमारे दीड महिन्यांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेर्याचा सेट न्यायालयात दाखल झाला होता. मात्र त्या कॅमेर्यांची क्षमता मर्यादित असल्याने असोसिएशनने ते नाकारले होते. त्यानंतर पुन्हा टेंडर काढून चांगल्या प्रतिचे कॅमेरे मागविण्यात आले होते. सध्या लावण्यात आलेल्या कॅमेर्यांमध्ये नाईट व्हीजन मोड देखील आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी न्यायालयाच्या आवारात होणार्या समाज विघातक कृत्यांवर नजर ठेवता येणार आहे.