धुळे। येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात खाजगी इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेले इंजि.स्वप्निल अहिरे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.24 रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान स्वप्निलने आत्महत्या कौटूंबिक कलहातून केल्याची चर्चा आहे. नकाणे रोडवरील श्रद्धा नगर येथे राहणारे स्वप्निल अहिरे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात खाजगी इंजिनिअर म्हणून काम करीत होते. त्यांचे मोठे बंधू पराग अहिरे हे देखील बांधकाम क्षेत्रात नावाजलेले इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्यांचे वडील धुळे वीज वितरण कंपनीतून सेवा निवृत्त झाले असून अहिराणी लेखक व कवी म्हणून त्यांची ओळख आहे.
पश्चिम देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सामाजिक क्षेत्रात व समाजात सुसंपन्न परिवार म्हणून परिचित असलेल्या अहिरे कुटुंबातील सर्वात लहान सदस्य असलेल्या स्वप्निल अहिरे यांनी रहात्या घरी पंख्याला दोरी बांधून त्याचा गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. स्वप्निल यास तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.सिद्धार्थ पाटील यांनी स्वप्निलला तपासून मृत घोषीत केले. शिवाय ही आत्महत्या मध्यरात्री झाली असल्याचा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला आहे. पश्चिम देवपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. स्वप्निल अहिरे हे मनमिळावू स्वभावाचे म्हणून सर्वांना परिचित होते. कौटुंबिक वाद तसेच आर्थिक चणचण यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, वहिणी, 1 मुलगी असा परिवार आहे. स्वप्निल अहिरे यांचे पोलिसात असलेले बंधु यांची तोरणमाळ येथे खाईत लोटून हत्या करण्यात आली होती.