पुणे – कौटुंबिक वादातून आपल्याच भाचीच्या पाच महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून पलायन करणार्या महिलेला विश्रांतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच सोलापूर रेल्वे स्थानकावरून जेरबंद केले. शुक्रवारी हा प्रकार घडला.
रत्ना मरोळ (35, रा. मूळ आंध्रप्रदेश) हिला अटक केले आहे. या प्रकरणी अमृता आखाडे (20 रा. धानोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. रत्ना ही अमृता यांची मावशी आहे. रत्नाचा अमृताच्या पतीसोबत वाद होता. त्या वादातून रत्ना हिने पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अमृताच्या पाच महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून घरातून पलायन केले. सकाळी अमृताच्या कुटुंबीयांनी मोबाइलवर तिच्याशी संपर्काचा प्रयत्न केला असता आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अमृता व तिच्या कुटुंबीयांनी विश्रांतवाडी पोलिसांत धाव घेत रत्नाविरोधात तक्रार दाखल केली.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजीत चौगुले, कर्मचारी दिनकर लोखंडे, सुनील खंडागळे, विनायक रामाणे, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, योगेश चांगण, ज्योती खरात, रुचिका जमदाडे यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. तिच्या मोबाईल लोकेशननुसार ती लोणावळा येथे असल्याचे कळले. पुणे तसेच सोलापूर रेल्वे पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्या जवळ असलेल्या लहान मुलीचे फोटो व्हॉटसअप वरून पाठवले. त्यानुसार चेन्नई एक्सप्रेसमधून रात्री बारा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून रत्ना आणि मुलीस सुखरूप ताब्यात घेतले.