कौशल्याधिष्ठीत शिक्षणाची गरज : विजय नारखेडे

0

हडपसर । देशाची प्रगती ही कुशल मनुष्यबळावर अवलंबून असते. कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षण करत असते. शिक्षणाच्या वाढत्या विस्तारामुळे सुशिक्षितांचे प्रमाण वाढत आहे. पण त्यापटीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजक निर्माण होण्यासाठी शिक्षणसंस्था, विद्यापीठे यांनी कौशल्याधिष्ठीत, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निश्चित करताना व्यावसायिक, उद्योजकांचे मार्गदर्शन घ्यावे. शिक्षणसंस्थांनीही उद्योजकांशी समन्वय साधला तर बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन युवकांचा राष्ट्रउभारणीत सहभाग वाढेल, असे प्रतिपादन उच्च शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पिंपरी, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भव्य रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन उच्च शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, मगर महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक चंद्रकांत निनाळे विजय कानिटकर, सचिन ढेरे, प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

2,775 उमेदवारांच्या मुलाखती
शहरी-ग्रामीण परिसरातील युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केला जात आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत समुपदेशन, मार्गदर्शनाबरोबरच अल्पमुदतीचे कौशल्यविकास उपक्रमाचे आयोजन केल्यास युवकांना योग्य दिशा मिळेल, असे कदम यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यात 42 उद्योजक कंपन्यांनी 2775 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील 936 उमेदवारांची निवड करण्यात आली असून 161 उमेदवारांना जागेवर थेट नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा भोसले यांनी केले तर आभार प्रा. अनिल जगताप यांनी मानले.