कौशल्य विकासावर भर देणे महत्त्वाचे

0

पुणे । आजपर्यंत आपण केवळ पुस्तकी ज्ञानाला महत्त्व दिले, त्यामुळे देशाचा कौशल्य क्षेत्रात विकास झाला नाही. जर हा विकास करायचा असेल तर पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य विकासावर भर देणे आज गरजेचे आहे, असे मत केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी शनिवारी व्यक्त केले.

कॉन्फीडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई पुणे मेट्रो आणि कुशल यांच्या वतीने कुशलता दिवसाचे औचित्य साधत यशदा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. राज्याच्या कामगार आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, क्रेडाई कुशलचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, आशियाना हाउसिंगचे अध्यक्ष विशाल गुप्ता, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे सचिव रणजीत नाईकनवरे, क्रेडाई युथ विंगचे समन्वयक आदित्य जावडेकर, जितेंद्र ठक्कर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने त्यांच्या कुशल वार्ता आणि कुशाल या उपक्रमा संदर्भातील पुस्तिकांचे अनावरणही करण्यात आले. तर क्रेडाईच्या महिला विंगच्या राष्ट्रीय समन्वयक दर्शना परमार -जैन आणि सहका-यांनी बांधकामाच्या ठिकाणी महिला कामगारांना कोणती कौशल्य शिकवायला हवी या संदर्भात एक प्रस्ताव रुडी यांना सादर केला.

कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देणार
राज्यात बांधकाम क्षेत्रात सुमारे 27 लाख कामगार कार्यरत आहेत. मात्र केवळ 6 लाख कामगारांची नोंदणी झालेली असून नजीकच्या भविष्यात आम्ही क्रेडाईच्या मदतीने ही नोंदणी करीत कामगारांना त्यांचा हक्क आणि सोयी देण्यासाठी प्रयत्नशील राहू. याबरोबरच कामगारांना प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण सेंटर वाढविण्यावर देखील आमचा भर असेल, असे आश्वासन राज्याच्या कामगार आणि कौशल्य विकास खात्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.

कामगार आणि ठेकेदारांचा सत्कार
राज्यातील दहा प्रमुख शहरांमध्ये कुशल या उपक्रमांतर्गत बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांना प्रशिक्षण देण्याचा संकल्पही करण्यात आला. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात बांधकाम क्षेत्राशी निगडीत एक हजार कामगारांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्यातर्फे घोषणा करण्यात आली. यावेळी कुशलता दिनाच्या औचित्याने कुशल उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षित झालेल्या आणि वेगळे काम केलेल्या बांधकाम कामगार आणि ठेकेदारांचा सत्कारही करण्यात आला.