पुणे । रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधीभवनतर्फे एका संगीतकाराची मुशाफिरी या सुप्रसिद्ध कौशल इनामदार यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संवादिका विंदा बाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या माध्यमातून त्यांचा संगीतप्रवास, मराठी अभिमान गीताचा जन्म, मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी त्यांची मत जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
बालगंधर्वसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं संगीत, मालिकांची शीर्षकगीत आणि त्यांच संगीत क्षेत्रातील योगदान हे रसिकांना माहीतीच आहे. या मुलाखतीच्या माध्यामतून त्यांच कविता, गझल लेखन, अमृताचा वसा हे कवितांच दालन श्रोत्यांसाठी खुला करणारा कार्यक्रम, त्यांचे अल्बम आणि मराठी अभिमानागीत करण्यामागची त्यांची भूमिका असे अनेक पैलू या मुलाखतीतून उलगडत गेले.
भाषेचा वाटप वाढवा
कौशल इनामदार यांनी यावेळी आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल श्रोत्यांना माहिती दिली. केशवसुत ते ग्रेस अशा अभिजात कवींच्या कविता जगाच्या कानाकोपर्यातल्या गायक-वादकांसह संगीताच्या माध्यमातून विश्वभर घेऊन जाण्याचा त्यांनी उचललेला वसा यामध्ये उपस्थितांनाही त्यांनी सहभागी करून घेतले. वीज वाचवायची असेल तर तिचा वापर कमी करायला हवा पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढावायला हवा, असा संदेश कौशल इनामदार यांनी याप्रसंगी दिला. गांधीभवन रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी कौशल इनामदारांच्या प्रकल्पाला उत्स्फुर्त प्रतिसाद जाहीर केला. अंजली वांबुरकर यांनी आभार मानले.