नवी दिल्ली : भारतीय खेळाडू सध्या सगळीकडे सगळ्या फॉरमॅटमध्ये धूम करत आहेत. पुरुष संघ अव्वल स्थानी विराजमान असताना आता भारतीय महिला संघानेदेखील नुकत्याच झालेल्या पात्रता स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचीब कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौर उत्कृष्ट कामगिरी करत क्रमवारीत चांगलीच झेप घेतली आहे. दोघींनी आयसीसीच्या महिला फलंदाजांच्या एकदिवसीय सामन्यांच्या यादीतील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान पटकाविले आहे. मिताली राज ही दुसर्या, तर हरमनप्रीत ही दहाव्या स्थानी आहे.
सातत्यपूर्ण कामगिरीचा फायदा
आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग ही 804 गुणांसह पहिल्या आणि मिताली राज ही 733 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौरने 533 गुण मिळविले असून ती दहाव्या क्रमांकावर आहे. हरमनप्रीतने शेवटच्या दोन चेंडूत आठ धावा काढल्याने भारताने रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाला पराभूत करत विश्व चषकाच्या पात्रता फेरीचा करंडक जिंकला होता. हरमनच्या या कामगिरीचा तिला चांगलाच फायदा झाला आहे. तर मितालीला तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा फायदा झाला आहे.
झूलन गोस्वामी तिसर्या स्थानी
गोलंदाजीत भारताची झूलन गोस्वामी तिसर्या आणि एकता बिष्ट ही आठव्या स्थानी आहे. जखमी असल्याने महिला विश्व चषक पात्रता सामन्यात खेळू न शकलेली झूलन अष्टपैलूच्या रॅकिंगमध्ये सातव्या, तर शिखा पांडे आणि दीप्ति शर्मा अनुक्रमे 19 आणि 20व्या स्थानी आहे. गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकाची मारिजाने काप ही पहिल्या, तर वेस्टइंडिजची स्टीफने टेलर ही दुसर्या क्रमांकावर आहे. विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या हरमनप्रीतने महिलांच्या फलंदाजीच्या यादीत दहावे स्थान पटकावले आहे.