ठेवीदारांसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी
फैजपूर- रावेर, यावल तालुक्यातील ठेवीदार शेकडो महिला-पुरुषांनी 9 ऑगष्ट रोजी क्रांतीदिनी शहरातील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या मागण्यांमध्ये प्राधान्याने शासनाकडे पाठवण्यात आलेल्या मृत व गंभीर आजारी व उपवर तसेच महिला ठेवीदारांचा प्रस्ताव 1999 च्या कायद्याची अंमलबजावणी, संघटनेच्या मुद्यांना न्याय मिळण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. खान्देश ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी रावेर, यावल तालुक्यातील फैजपूर, सावदा या ठिकाणावरील पतपेढ्यांमधून पैसा अडकून पडलेले ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठेवीदारांना एक हजार कोटींचे पॅकेज द्या
यावेळी यावल येथील सहाय्यक निबंधक यांनी निवेदन स्वीकारले. त्यावेळी त्यांच्याशी संघटनेच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. या निवेदनात शासनाकडे पाठविण्यात आलेल्या मृत, गंभीर आजारी, तसेच महिला ठेवीदारांचा प्रस्ताव पूर्वीचा व नवीन यादी तत्काळ मंजूर करण्यात यावी किंवा जिल्ह्यातील ठेवीदारांसाठी एक हजार कोटी रुपये तात्काळ मंजूर करण्यात यावे. पतसंस्था चालकांविरुद्ध एमपीडीण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, तापी पतसंस्थेच्या प्रशासकपदी तत्काळ क्लासवन अधिकार्याची नेमणूक करण्यात यावी, याआधी झालेल्या उपोषणादरम्यान देण्यात आलेल्या निवेदनावर काय कारवाई करण्यात आली ? याचा खुलासा करण्यात यावा यासह विविध दहा ते बारा मागण्यांचा समावेश आहे. या उपोषणाची सायंकाळी सांगता झाली.
राज्यमंत्री व आमदारांच्या घरासमोर यापुढे आंदोलन
उपोषणादरम्यान संघटनेचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, गंभीर आजारी ठेवीदारांचा प्रस्ताव मान्य करावा तसेच संघटनेच्या प्रमुख मागण्यांसाठी आता यापुढे भुसावळ-यावलमधील आमदार त्यानंतर राज्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने मागण्या मान्य करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.