पिंपळनेर । आजच्या तरूणांनी बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंटया भिल्ल, उमाजी नाईक, एकलव्य आदिं क्रांतिवीरांचे विचार अंगी बाळगून समाजात परिवर्तन घडवून आणावे असे प्रतिपादन प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. यावेळी विचारमंचावर प्रा.वसावे, आदिवासी संघटनेचे तानाजी बहिरम गृहपाल मनोज पाटील आदि उपस्थित होते. शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, पिंपळनेर येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यक्तीमत्त्वासोबत समाजाचे जीवनमान उंचवावे
आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात भरारी मारून स्वतःच्या व्यक्तिमत्वाबरोबर समाजाचे जीवनमान उंचवावे असेही यावेळी सांगितले . यावेळी प्रा. वसावे यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन घडवावे. तसेच तानाजी बहिरम यांनी आदिवासीमध्ये मनुवादी विचार पेरले जात आहेत , ते विचार आदिवासी जीवनात बदल घडवून आणण्यास हानिकारक आहेत हे आजच्या तरूणांनी लक्षात घ्यायला हवे. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचलन गृहपाल मनोज पाटील यांनी करून आभारही मानले. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिवीर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंटया भिल्ल, एकलव्य आदिंना पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थोरात, सौ.गवळी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
पुरोगामी विचार अवलंबवा
यावेळी पुढे बोलताना डॉ. मस्के म्हणाले की, आदिवासी क्रांतिवीरांनी शोषणाच्या विरोधात , अन्यायाच्या विरोधात लढे देऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आजही आदिवासी समाजाचे प्रचंड खच्चीकरण केले जाते, अन्याय अत्याचार केला जातो यासाठी आजच्या तरूणांनी जागरूक राहून प्रतिकार करणे गरजेचे आहे. लाजरेपणा बाजुला सारून आत्मविश्वास मनी बाळगून जीवनाची वाटचाल करावी. आदिवासीच्या समस्या , बेरोजगारी, गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न आजच्या तरुणांनी करावेत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही भूमिका अंगी बाळगावी. परिवर्तनशील म्हणजे पुरोगामी विचारांनी समाज मन बदलायला हवीत. आदिवासींना वनवासी, गिरीजन अशा नावानी संबोधून त्यांचा मूळ आदिवासींचा मुलनिवासिंचा इतिहास पुसला जात आहे. याकडेही आदिवासी सुशिक्षितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.