क्रांतीवीर दामोदर चापेकर यांच्यावर टपाल तिकीट

0

सुमित्रा महाजन यांच्या हस्ते रविवारी अनावरण
पिंपरी-चिंचवड :क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्यावरील टपाल तिकीट काढण्यात आले आहेत. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते चिंचवडगावातील, क्रांतीतीर्थ चापेकरवाडा येथे दुपारी अडीच वाजता अनावरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे आदी उपस्थित राहणार आहेत.

खासदार बारणे यांचे प्रयत्न
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, क्रांतीवीर चापेकर बंधुचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे. क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांनी 1897 मध्ये वॉल्टर चार्ल्स रँडचा वध केला होता. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्य संग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. या माझ्या पाठपुराव्याला यश आले

लोकसभा अध्यक्ष प्रथमच शहरात
केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे, ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. तिकीट काढण्यासाठी लागणार्‍या सर्व कागदपत्रांची पुर्तता चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी केली. त्याचबरोबर या तिकीटाचे अनावरण मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या व लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त लोकसभेच्या अध्यक्षा पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत