चेतक महोत्सवाला 20 लाख पर्यटक देणार भेट ; तयारीला दिला वेग
सारंगखेडा- श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला 12 डिसेंबरपासून प्रारंभ होत असून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यांना यात्रेला येण्याचे निमंत्रण दिले. श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. ही यात्रा अश्व बाजारासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून यात्रेत चेतक महोत्सव भरविला जात आहे. या उपक्रमाला पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभत आहे. गेल्या वर्षी झालेल्या चेतक महोत्सवाला देश, विदेशातील पर्यटक आले होते. गेल्या वर्षी महोत्सवाला सुमारे 16 लाख पर्यटकांनी भेट दिली. देशातील विविध भागांतून सुमारे दोन हजार अश्व विक्रीसाठी आले होते. यंदा महोत्सवाला 20 लाख पर्यटक भेट येतील, असा अंदाज आहे.
क्रिकेटच्या बादशाहला निमंत्रण
राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर यांना यात्रेला येण्याचे नुकतेच निमंत्रण दिले. यासाठी त्यांनी मुंबईत सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. सचिनने यात्रेला येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती देण्यात आली. चेतक महोत्सवानिमित्त काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. या विषयी चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जपालसिंह रावल यांनी सांगितले की, क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरला यात्रेचे निमंत्रण देण्यात आले आहे.