क्रिकेटच्या स्टेडियममध्ये हत्तींचे थैमान

0

कोलंबो । श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना गुरुवारी हंबनटोटा स्टेडियममध्ये खेळवला जाणार होता. मात्र या सामन्याला दोन दिवस उरले असतानाच स्टेडियममध्ये घुसून हत्तींच्या कळपाने थैमान घातले आहे. या हत्तींच्या कळपाने थेट स्टेडियमच्या पीचवरच हल्लाबोल केला. यामुळे आता या हत्तींपासून संरक्षण मिळावं याकरता स्टेडियममध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यामुळे आता गुरुवारी होणार्‍या सामन्यात कोणतेही विघ्न येऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

हत्तींच्या अभयारण्याजवळच उभारलंय स्टेडियम
जवळपास 35 हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी या स्टेडियमची क्षमता असलेले हे स्टेडियम हत्तींच्या अभयारण्याजवळ आहे. त्यामुळे कमीतकमी 25 हत्तींचा कळप येथे सहजच पहायला मिळतो. हंबनटोटा हे स्टेडियम 2009मध्ये बांधण्यात आले आहे. मात्र ते शहरापासून फारच दूर आहे. तसेच या परिसरात हत्तींचा वावर प्रचंड असल्याकारणामुळेही इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने भरवले जात नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तवदेखील या स्टेडियममध्ये कमीच सामने खेळवले जातात.

वन विभागही अडचणीत
इथल्या वनविभागाच्या अधिकार्‍याने याबाबत माहिती देताना सांगितले की, हत्तींचे सुरक्षा रक्षकांचे कडे मोडून स्टेडियमच्या आत घुसण्याच्या घटना तशा फारशा घडत नाहीत. मात्र सामन्याच्या दोन दिवसाअगोदरच हतींनी स्टेडियममध्ये घुसून थेट पीचवरच धुमाकूळ घातल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच ही घटना अचानकच घडली आहे.

झिम्बाब्वे यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामने खेळवले जात आहेत. आता 1-1 अशी या मालिकेची स्थिती आहे. गुरुवारच्या सामन्याकडे प्रेक्षकांचे लक्ष. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून प्रयत्नांचा शिकस्त. शहरापासून दूर अंतरावरील स्टेडियमकडे प्रेक्षकांची पाठ. वनाधिकार्‍यांकडून विशेष खबरदारी.

सुरक्षेत वाढ
हंबनटोटा स्टेडियम हे जंगलापासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे सामन्याच्या अगोदरपासूनच स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जवळपास 10 सुरक्षा रक्षक याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.