श्रीनगर: राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळल्यामुळे टीकांच्या केंद्रस्थानी सापडलेल्या जम्मू-काश्मीरच्या परवेझ रसूल या अष्टपैलू खेळाडूने आपले मौन सोडत टीकाकारांना उत्तर दिले आहे. क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळू द्या, त्यांना उगाच राजकारणात खेचू नका. मी नेहमी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो आणि अशा घटनांचा माझ्यावर मी कोणताही परिणाम होऊ देत नाही, असे परवेझने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील कानपूर येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात राष्ट्रगीतावेळी परवेझ रसूल च्युईंगम चघळताना दिसला होता.
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील कानपूर येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात राष्ट्रगीतावेळी परवेझ रसूल च्युईंगम चघळताना दिसला होता. परवेझ या कृतीवर सोशल मीडियामध्ये जोरदार टीका केली गेली. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे राष्ट्रगीत सादर केले जाते. याच प्रथेनुसार भारताचे सर्व खेळाडू एका रांगेत उभे राहून राष्ट्रगीत म्हणत होते. भारताचे सर्व खेळाडू राष्ट्रगीत म्हणत होते. पण त्याचवेळी परवेज रसूल मात्र च्युईंगम चघळत असताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. या व्हिडिओवर लोकांनी टीकेचा भडिमार केला. रसूलने मात्र या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले होते. परवेझ म्हणाला की, एकतर आधीच मी ज्या प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करतो, अशा भागातील खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी क्वचितच मिळते आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा अशा अनावश्यक गोष्टी त्रासदायक ठरतात. अशा निरुपयोगी प्रकरणांना महत्त्व न देता खेळाकडे लक्ष केंद्रीत करणे आमच्यासारख्या नवख्या खेळाडूंना कठीण जाते, असे परवेझ म्हणाला.