क्रिकेटपटू दिनेश पुनियाच्या विरोधात नौसेनेचे अटक वॉरंट

0

नवी दिल्ली । भारतीय नौसेनेने हरियाणाचा अष्टपैलु क्रिकेटपटू आणि अ‍ॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पुनियाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दीपक ना हरकत प्रमाणपत्राशिवाय हरियाणाकडून रणजी क्रिकेट खेळतो आहे. 24 ऑक्टोबरला जारी करण्यात आलेल्या वॉरंटमध्ये आयएनएसचे आंग्रेचे कमाडिंग ऑफिसर कमांडर एमएमएस शेरगिल,र यांनी हरियाणा आणि मुंबई पोलीस आणि डीएनपीएम दिल्ली यांना पूनियाला अटक करण्याचे अधिकार दिले आहेत. दीपक पूनियाने नेव्ही अ‍ॅक्ट 1957 चे उल्लंघन केल्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, असे या वॉरंटमध्ये लिहिण्यात आले आहे. 24 वर्षांचा दीपक पूनिया 2014 मध्ये नौसेनेत दाखल झाला होता. दीपकने याआधी रणजीचे दोन मोसम सौराष्ट्रकडून खेळले तर या मोसमात तो हरियाणाचे प्रतिनिधित्व करत आहे. दीपक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सदस्य होता. हरियाणाकडून दोन सामने खेळल्यावर पूनियावर अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी)चे सचिव सत्यव्रत शेरून यांनी बीसीसीआयला पत्र पाठवले आहे.

दीपक पूनियाच्या ना हरकत प्रमाणपत्राची मुदत संपलेली आहे, त्यामुळे त्याला पुन्हा पेरेंट डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात येत असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 2016-17 साठी देण्यात आलेल्या ना हरकत प्रमाणपत्रालाच बीसीसीआयने या मोसमासाठी मंजुरी दिल्याचा आरोप पत्रात करण्यात आलाय.

बीसीसीआयने आरोप फेटाळले
पूनियाने सौराष्ट्रकडून एनओसी घेतली आहे. दीपक पहिले सौराष्ट्रकडून खेळत होता. टीम पूनियाच्या कागदपत्रांवर संतुष्ट होती. पूनियानं एनओसीची औपचारिकता पूर्ण केल्यामुळे त्याला हरियाणाकडून खेळायला परवानगी देण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं आहे.

पूनियाचं स्पष्टीकरण
मी हरियाणाकडून खेळणार असल्याचे नौसेनेच्या अधिकार्‍यांना सांगितल्याचा दावा पूनियाने केला आहे. ड्यूटीवर असताना मी दुसर्‍या राज्याकडून खेळू शकणार नाही. पण सुट्टी घेऊन दुसर्‍या राज्याकडून खेळता येऊ शकेल, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी 30 दिवसांची सुट्टी घेऊन खेळायला सुरुवात केली. यानंतर सुट्टी वाढवण्यासाठी सांगितले असता नकार देण्यात आल्याचे पूनिया म्हणाला. कामावर परत न आल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशाराही देण्यात आला आणि आता अटक वॉरंट पाठवल्याची प्रतिक्रिया पूनियाने दिली आहे. दुसरे खेळाडूही नोकरी करत असताना इतर राज्यांकडून खेळत आहेत. याआधी कोणालाच याबाबत समस्या नव्हती, पण आता मी हरियाणाकडून खेळू शकणार नाही, असे वक्तव्य पूनियाने केले आहे.