पिंपरी-चिंचवड : तामिळनाडू प्रीमिअर लीग (टीपीएल) स्पर्धेत सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा खेळत असताना निगडी पोलिसांच्या पथकाने राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री चिखलीतील मित्तल बिल्डींग येथे करण्यात आली. आरोपींमध्ये काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद रमजान शेख (वय 47, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांच्यासह नवीन भगवान मित्तल (वय 43, रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमीचंद मेहता (वय 37, रा. बालाजीनगर, धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) व जाकीर मस्तान शेख (वय 29, रा. विद्यानगर, चिंचवड) यांचा समावेश आहे.
पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
चिखलीतील मित्तल बिल्डींगमध्ये असलेल्या एका सदनिकेत तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेतील क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार, निगडी पोलिसांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी रमजान शेख यांच्यासह वरील पाचही जण सट्टा खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी पाचही संशयितांना अटक करत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, लॅपटॉप, मोबाईल व रोख 53 हजार 500 रुपये असा एकूण दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला सट्टा खेळत असताना अटक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण करत आहेत.