क्रिकेट मंडळाचे तीन तेरा

0

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि लोढा समितीत सुरू असलेल्या बहुचर्चित खटल्याचा स्फोट झाला. बीसीसीआयचेे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी करत क्रिकेट मंडळाचे तीन तेरा वाजवले. आता उपाध्यक्ष व सहसचिवांकडे तात्पुरते अधिकार देण्यात आले असून, येत्या 19 जानेवारीला नवीन प्रशासकीय समिती नियुक्त करून भारतीय क्रिकेटचा कारभार चालवला जाणार आहे. आता पुढचे भवितव्य काय असेल याकडे देशासह जगाचे लक्ष लागले आहे.

न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यात टाळाटाळ करणे शिर्के आणि ठाकूर यांना भोवले आहे. ठाकूर तर आणखीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेच परिषद (आयसीसी) आणि बीसीसीआयमध्ये काय चर्चा झाली याबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी ठाकूर यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, केवळ माफी मागून हे प्रकरण संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या प्रकरणी मंडळावर ज्या पद्धतीने कठोर कारवाई झाली तशीच कारवाई होण्याची व ठाकूर यांना ‘जेल यात्रा’ घडण्याचीही शक्यता वाढली आहे. मंडळावर केवळ कारवाई करून न्यायालय थांबलेले नाही, तर मंडळाशी संलग्न संघटनांनी जर लोढा समितीच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत, तर त्यांच्यावरही अशीच कारवाई होणार आहे. ज्या सदस्यांनी नऊ वर्षांपेक्षा जास्त काळ पद भोगले आहे, त्यांना पद सोडावे लागेल. मंडळाची प्रशासकीय समिती नवीन पदाधिकार्‍यांची निवड करेल. या निर्णयाचा थेट फटका भारतीय क्रिकेटला बसणार नाही, मात्र मंडळासह प्रत्येक संलग्न संघटनेत फार मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार आहेत आणि त्याचा मात्र प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका भारतीय क्रिकेटला बसणार, हे उघड आहे.

ज्येष्ठ वकील फली एस. नरीमन आणि गोपाळ सुब्रमण्यम यांच्याकडे नवी कार्यकारिणी व प्रशासकीय समितीचे सदस्य निवडण्याची जबाबदारी न्यायालयाने दिली असून, येत्या 19 तारखेला याबाबतची अंतिम घोषणा केली जाईल. ही नवी समिती नवीन निवडणुका होईपर्यंत मंडळाचे दैनंदिन कामकाज पाहील. अनुराग ठाकूर व अजय शिर्के यांची हकालपट्टी करून मंडळातील सर्वात वरिष्ठ उपाध्यक्ष व सहसचिव दैनंदिन कामकाज पाहतील, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. लोढा समितीच्याच शिफारशींतील वयाची अट, एक व्यक्ती- एक पद या चौकटीत सध्याच्या कार्यकारिणीतील एकही व्यक्ती बसत नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे. इंडियन प्रिमिअर लीगमध्ये (आयपीएल) 2013 साली स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी, बुकींशी संपर्क वगैरे गैरप्रकार घडल्याचे समोर आले. त्याचवेळी या सगळ्याचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा यांची समिती नियुक्त केली होती.

या समितीने वारंवार मुदतवाढ घेत अखेर आपला पूर्ण अहवाल न्यायालयास सादर केला. त्यात तेरा खेळाडूंवर संशयाची सुई ठेवण्यात आली होती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. याशिवाय मंडळाचे दैनंदिन कामकाज आणखी पारदर्शक करण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या होत्या. पदाधिकारी, त्यांचे वय, मुदत, कार्यकाळ, संलग्न संघटनांना दिला जाणारा निधी व त्याचा वापर या सर्व गोष्टींवर काही बदल मंडळाला करायला सांगितले होते. मात्र, मंडळाने या सर्वांकडे साफ दुर्लक्ष केल्याने हा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गेला व न्यायालयाने आता मात्र खैर नाही, असे सुनावत मंडळाला या सर्व सुधारणा व शिफारशी स्वीकारा अन्यथा अत्यंत कठोर कारवाई करू, असा इशारा दिला होता. प्रशासकीय समिती स्थापन झाल्याबरोबर मंडळाच्या सध्या कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे अधिकार संपुष्टात येतील. क्रिकेट मंडळाचा दैनंदिन कारभार पूर्णपणे लोढांच्या शिफारशींनुसार ही समिती करेल.

सामन्यांचे आयोजन, आवश्यक निधी वाटप, संघ निवड, दौरे निश्‍चिती, मंडळाच्या सर्व स्पर्धांचे नियोजन आदी सर्व कामे ही समिती आणखी काही उपसमित्या नेमून करेल. पण हे सर्व करत असताना ज्या संलग्न संघटनांना विविध कारणांसाठी जो काही निधी दिला जाईल त्यांचा प्रत्येक रूपयाचा हिशेब ठेवला जाईल व खास समिती त्याच्या पूर्ण वापराबद्दल पारदर्शकता राखली जाते का ते पाहील. कोणत्याही संघटनेने निधीचा गैरवापर केल्याचे आढळले, तर त्या संघटनेवरही प्रशासक नियुक्त केला जाईल. गोवा, जम्मू-काश्मीर, ओडिशा, राजस्थान या संघटनांबरोबरच सध्या दिल्ली संघटनेबाबतही वाद सुरू आहेत. यात काही वाद अंतर्गत राजकारणाचे, तर काही निधीच्या गैरवापराचे आहेत. हे सर्व वाद व गैरप्रकार रोखण्यासाठी लोढा समिती आणखी कठोर पाऊल उचलेल. कोणत्याही संघटनेच्या कोणत्याही पदाधिकार्‍याला कोणतीही खर्चिक बाब समितीला विश्‍वासात न घेता करता येणार नाही. ज्या राज्यात एकापेक्षा जास्त संलग्न संघटना आहेत, त्यांना रोटेशननुसार मताधिकार दिला जाईल. एकूणच भारतीय क्रिकेट व प्रशासन पारदर्शक करण्याचा विडा लोढा समितीने उचलला आहे. बघू या, यात ते किती यशस्वी ठरतात.

– अमित डोंगरे
मुक्त क्रीडा पत्रकार, पुणे
9922421535