क्रिकेट संघटक एस.एच.जाफरी यांचा गौरव संपन्न

0

मुंबई  । मुंबईतील सामन्यांमधील भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक एस.एच. जाफरी यांच्या क्रिकेट क्षेत्रातील तब्बल 4 दशके योगदानाबद्दल 24 व्या गिरनार आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेप्रसंगी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे विशेष गौरव करण्यात आला. शिवाजी पार्क मैदानात त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, हिंदुजा हॉस्पिटल क्रिकेट संघाचे सेक्रेटरी मिलिंद सावंत व उद्यानगणेश मंदिर सेवा समितीचे व्यवस्थापक संजय आईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदाची धुरा क्रिकेटपटू व संघटक एस.एच.जाफरी यांनी गेल्या रविवारी झालेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय सामन्यासह पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळली. वर्ल्ड कप जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचे ते मिडिया मॅनेजर देखील होते. तसेच मुंबईच्या सबज्युनियर, ज्युनियर,सिनियर आदी रणजी संघाचे व्यवस्थापकपदी देखील ते होते. आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेचे एक जनक असलेले जाफरी यांनी गेली 24 वर्षे चेअरमनपद यशस्वी सांभाळलेले आहे. टाटा हॉस्पिटल संघाचे कुशल माजी कर्णधार व प्रमुख गोलंदाज एस.एच.जाफरी यांच्या नावावर माजी विजेत्या लीलावती हॉस्पिटलविरुद्ध नोंदविलेल्या एकमेव हॅटट्रिकची नोंद गिरनार आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात आहे. टाटा हॉस्पिटल या भारतातील एकमेव रुग्णालयीन क्रिकेट संघाने इंग्लंडचा यंदा यशस्वी दौरा करून 3-2 असा विजय मिळविला होता, त्यामागील प्रेरणा एस.एच.जाफरी यांची होती.