बोदवड । शालेय जीवनात चांगले यश मिळविण्यासाठी अभ्यासाला नक्कीच महत्व आहे. मात्र, अभ्यासासोबतच शालेय जीवनात खेळालादेखील महत्व द्या. खेळामुळेच शरीर आणि मनाचा विकास साधला जात असून यातूनच व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास साधला जात असतो. तसेच एखाद्या खेळात नैपुण्य प्राप्त केल्यास यातून क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी देखील प्राप्त होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे देखील लक्ष द्यावे असा सल्ला बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.डी.बावस्कर यांनी दिला. शहरात तालुकास्तरीय क्रीडा नुकतीच उत्साहात पार पडली या स्पर्धेत तालुक्यातील खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. विविध क्रिडा प्रकारात विद्यार्थ्यांनी रंगतदार कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण करताना ते बोलत होते. याप्रसंगी स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले.
बोदवड स्पोर्ट अॅकॅडमी, पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि बरडिया इंटरनॅशनल स्कूलच्या पुढाकाराने शहरातील बरडिया स्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील विविध विद्यालयातून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंगळावार 21 रोजी या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या 53 आणि तीन खासगी, अशा 56 शाळांमधील 460 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचे दर्शन झाले. त्यातील कबड्डी आणि लंगडीच्या सामन्यांमध्ये चांगलीच रंगत पहावयास मिळाली. या विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणार्या 124 विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरवण्यात आले.
मैदानी खेळांकडे वळा
पोलीस याप्रसंगी मिठुलाल अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आजची पिढी हि मोबाईलच्या आहारी जात आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कमी वयातच डोळ्यांना चष्मा लागण्यासारख्या समस्या उद्भव आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलला वेळ न देता मैदानी खेळाकडे वळून आपले आरोग्य सुदृढ करावे असा सल्ला दिला.
124 विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुर्हा हरदो, सुरवाडे, मुक्तळ, शिरसाळा, साळशिंगी, बोदवड कन्या शाळा यांनी विजयश्री संपादन केली. यानंतर लांब उडी 12, गोळाफेक 12, धावणे 36, खो-खो 24, कबड्डी 20, लंगडी 20 अशा एकूण 124 विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप झाले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले. स्पर्धेच्या तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद जैन, डॉ. यशपाल बडगुजर, व्ही.सी.धनके, रामचंद्र काळे, गोविंदा ठाकरे, शिवदास लवंगे, नितीन पाटील, कवरसिंग राजपूत, अजय वाघोदे, कोमलसिंग पाडवी, मंगेश तिकडे, राजेश फिरके, गितांजली बोरोले यांनी परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी मिठुलाल अग्रवाल, अरविंद जैन, अंबादास चौधरी, शिक्षकांची उपस्थिती होती.