चिंचवड : क्रीडांगणावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणावर खुनी हल्ला झाला. ही घटना रविवारी (दि. 16) दुपारी चिंचवड येथे घडली. गँगवार मधून पाचजणांनी हा हल्ला केला आहे. सिद्धेश शेलार (वय 25, रा. चिंचवडगाव) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय उर्फ बेडक्या कांबळे, जॉनी उर्फ आशितोष जगताप (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्देश हा आपल्या मित्रांसोबत रविवारी दुपारी साडेतीनला केशवनगर येथील मोरया गोसावी क्रीडांगणावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. चार वाजताच्या सुमारास सात ते आठ जण तोंडावर रुमाल बांधून क्रीडांगणावर आले. त्यांनी सिद्धेश याच्यावर हल्ला चढविला. लोखंडी कोयत्याने सिद्धेश याच्या डोक्यात मारले. त्याच्या मित्रांनी त्यास वाचविण्यासाठी धाव घेतली असता त्यातील काहीजणांना आरोपींनी दांडक्याने मारहाण केली. हल्ला केल्यावर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी सिद्धेश याला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.