क्रीडापटूंना अच्छे दिन; आहार भत्त्यात वाढ

0

नवी दिल्ली-स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (साई) या संस्थेत काही बदल होणार आहेत असे सांगत देशातील किडापटूंसाठी आनंदाची अशी एक घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केली. या संस्थेअंतर्गत क्रीडापटूना देण्यात येणाऱ्या दैनंदिन आहार भत्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

देशातील क्रीडापटूंना जेवणा-खाण्यासाठी ठराविक दैनंदिन आहार भत्ता साई या संस्थेमार्फत देण्यात येतो. या भत्त्याची रक्कम अतिशय कमी असते, अशी ओरड मधल्या काळात करण्यात येत होती. ही बाब लक्षात घेत हा दैनंदिन आहार भत्ता वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली. तसेच, हा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रीडापटूंना खुशखबर देण्याबरोबरच देशातील क्रीडाविषयक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेली स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) ही लवकरच कात टाकणार असून संस्थेच्या कार्यपद्धतीत अनेक बदल करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘साई’चे नाव लवकरच बदलण्यात येणार असून ही संस्था सध्या तरी ‘स्पोर्ट्स इंडिया’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे, असे राठोड म्हणाले. याव्यतिरिक्त, संस्थेच्या कार्यपद्धतीत आणि पदांच्या संबंधितही काही बदल करण्यात येणार आहेत. या संस्थेतील काही पदे रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात येणाऱ्या पदांवर सध्या काही लोक कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्या जागी पुन्हा भरती करण्यात येणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.