क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांनी मोठ्यांना कधीही विसरू नये

0

जळगाव। सोशल मिडीयामुळे एकाग्रता भंग होण्याचा धोका असल्यामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या खेळाडूंनी सोशल मिडीयापासून दूर रहावे त्याच बरोबर प्रत्येक स्पर्धेच्यावेळी आपले गुरू, आई-वडील आणि सहकार्य करणाज्या मित्रांची आठवण ठेवल्यास कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू विजय चौधरी यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘जिमखाना डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी होते. मंचावर क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते. गेल्या दोन वर्षापासूनचे शौक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाज्या खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला.

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी व्यक्त केले मनोगत
विजय चौधरी म्हणाले की, आई-वडील हे आपल्या भल्यासाठी सांगत असतात त्यामुळे त्यांचे आपण ऐकायला हवे, त्यांना उलट उत्तर देवू नये, मेहनत आणि कष्टाशिवाय यश नाही. आज अनेक तरूण मित्र व्यासनाच्या आहारी जात आहेत त्यांना त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या खेळातील अपयशामुळे मनाची स्थिती कमजोर होते आणि हा खेळाडू संपला असे अनेकजण म्हणू लागतात तेव्हा हतबल न होता त्या मनाच्या स्थितीला आपली ताकद बनवा आणि खेळा अशा वेळी कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 2012 मध्ये माझ्याही पायाला दुखापत झाली तेव्हा विजय संपला असे अनेक जण म्हणत होते. मात्र मी त्या मनाच्या कमजोर स्थितीला माझी ताकद बनविली आणि यश प्राप्त केले.

आपला प्रवास सांगताना चौधरी म्हणाले की, घरात वडील आणि भाऊ पहिलवान होते. मला कुस्तीपेक्षा क्रिकेटची आवड होती मात्र वडीलांनी कुस्तीसाठी मार्गदर्शन केले. दहावीपासून कुस्ती खेळू लागलो. सकाळी कॉलेज दुपारी कुस्तीचा सराव, शेतीची कामे असे करून कुस्ती शिकलो. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून खेळताना कोल्हापूर येथे कुस्तीत ब्रांझ पदक मिळाले. पुन्हा पुण्याला गेलो कुस्तीसाठी प्रवेश घेतल्याची माहिती सांगितली.

प्रथम दहा महाविद्यालय
सन 2016-17 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रथम दहा महाविद्यालये पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे, व्दितीय क्रमांक – चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव. तृतीय क्रमांक – नवापूर महाविद्यालय. चौथा क्रमांक- उत्तमराव पाटील महाविद्यालय, दहिवेल, पाचवा क्रमांक – पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, शहादा, सहावा क्रमांक – श्रमसाधना संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी, सातवा क्रमांक – देशमुख महाविद्यालय, भडगाव, आठवा क्रमांक- एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपुर, नववा क्रमांक – एम.डी.पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे, उत्तेजनार्थ – एकलव्य शरीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव तसेच महिला महाविद्यालयांमधुन प्रथम क्रमांक – डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय यांनी पटकाविला. उत्कृष्ट विभागात जळगांव विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.