क्रीडा विकासावरील खर्च म्हणजे भविष्यासाठीची गुंतवणूक : बागुल

0

बारामती । शासनाचा क्रीडा विभागामार्फत राबविले जाणारे उपक्रम व योजना ह्या राष्ट्राची भावी पिढी निरोगी, बळकट व सामर्थ्यशाली बनविण्यासाठी आहेत. देशातील नवतरुण राष्ट्राची संपत्ती असून त्यांचे चांगल्या प्रकारे जडणघडण होणे महत्त्वाचे आहे. क्रीडा विकासावर करण्यात येणारा खर्च हा भविष्यासाठी केली जाणारी गुंतवणूक असल्याचे मत तालुका क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव काळात माहिती कार्यालयाच्या वतीने संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन भोईराज तरुण मंडळ, भोईगल्ली, बारामती येथे करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक रमेश भोकरे, निलेश इंगुले, एस.एस. कुंभार, राजेंद्र सरग, रवी करळे, विलास कसबे, शरद नलवडे, मिलिंद भिंगारे, ए.एम. खान, भीमराव गायकवाड, परिसरातील खेळाडू, नागरीक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बागुल म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी वयाच्या 5 वर्षांपासून शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तालुकास्तरावर खेळाडू तयार व्हावेत यासाठी तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. शालेय शिक्षणात खेळाला दुय्यम स्थान न देता कोणताही खेळ मुलांना मनापासून खेळू द्यायला हवा. खेळात राज्य, राष्ट्रीय स्तरावरील विशेष प्राविण्य मिळविणार्‍या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती, विविध पुरस्कार, नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी आरक्षित जागा उपलब्ध केल्या जात आहेत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत वयाच्या 50 वर्षांनंतर खेळाडू पेन्शन योजना चालू आहे. नोंदणीकृत युवक क्रीडा मंडळांना व्यायामशाळा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. खेळामुळे आपले शरीर निरोगी व बळकट राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे विशेष लक्ष देण्याची गरजबागुल यांनी यावेळी व्यक्त केली. सहायक निबंधक कुंभार यांनी शहरातील नागरीकांना हाउसिंग सोसायटी नोंदणी प्रकियेबद्दल माहिती दिली. तसेच शासनाच्या कर्जमाफी योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याविषयीची सविस्तर माहिती देऊन लवकरात लवकर फॉर्म भरून लाभ घेण्याचे आवाहन केले.

सरग म्हणाले, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ज्या संकल्पनेतून राबविला. त्याच धर्तीवर माहिती विभागाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती व प्रबोधनात्मक जनजागृती व्हावी, या उद्देशाने संवादपर्व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मासिक लोकराज्याचे वाचक होण्याचे आवाहन सरग यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रवी करळे यांनी मानले.