क्रीडा विभागातील अधिकारी धारेवर

0

पिंपरी-चिंचवड : क्रीडा विभाग मरगळला आहे. शहरात महापालिका 38 व्यायामशाळा चालवते. मात्र, त्यातील अनेक व्यायामशाळा उघडल्याच जात नाहीत. साहित्याचा हिशोबदेखील नाही. बंद व्यायामशाळा चालू असल्याचे भासविले जाते. क्रीडा विभागाचे 12 कोटी रुपयांचे बजेट आहे. एवढे बजेट असूनही त्याचा योग्य प्रकारे वापर होत नसेल तर काय उपयोग. क्रीडा पर्यवेक्षक काम करत नाहीत. येथून पुढे असे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात महापौर नितीन काळजे यांनी क्रीडा विभागाच्या अधिकार्‍यांचे कान टोचले. क्रीडा व क्रीडा प्रबोधिनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नेहरुनगरातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मल्लखांब, योगा व जिमनॅस्टिक्स असे राष्ट्रीय खेळ महापालिकेच्या सर्व शाळेत सुरू करावेत, असे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले.

यांची होती उपस्थिती
बैठकीस सभागृह नेते एकनाथ पवार, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, माजी महापौर मंगला कदम, भीमाताई फुगे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.

विविध विषयांचा आढावा
या बैठकीत, शालेय क्रीडा धोरण, विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन, क्रीडा प्रबोधिनी कामकाज धोरण, क्रीडा विकासात स्वयंसेवी संस्था व संघटनांचा सहभाग वाढविणे, क्रीडा साहित्याची खरेदी, खेळाडुंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, खेळांच्या मैदानांची देखभाल-दुरुस्ती व वापराचे नियोजन, या विषयांसह क्रीडा व क्रीडा प्रबोधिनी विभागातील अन्य कामकाजासंदर्भातील विषयांवर चर्चा झाली.

अधिकार्‍यांसाठी सूचना
कुस्ती, कबड्डी व खो-खो खेळांबाबतच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, त्याचे वेळापत्रक आगाऊ तयार करून सर्व पदाधिकार्‍यांना द्यावे, ज्या व्यायामशाळा कार्यरत नाहीत व ज्या व्यायामशाळांमध्ये कमी सभासद आहेत; त्या तातडीने बंद कराव्या, अद्ययावत क्रीडा वसतिगृह व विश्रामगृह तयार करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवावा, व्यायामशाळेत अत्याधुनिक व्यायाम साहित्य ठेवावे, क्रीडा विभागात क्रीडा शिक्षक कमी पडत असल्याने निवडणूक शाखेकडे वर्ग केलेले क्रीडा शिक्षक परत क्रीडा विभागात बोलवावे, अशा सूचना महापौरांनी केल्या.