क्रीडा संकुलाची सुरक्षा वार्‍यावर

0

जळगाव । महसूल प्रशासनाला वर्षभरात करोडोचे उत्पन्न मिळवून देणारे जिल्हा क्रीडा संकुलाची सुरक्षा संपूर्ण पणे वार्‍यावर आहे. जिल्हा क्रीडा संकुलातच क्रिडा अधिकार्‍याचे दालने असताना त्यांचा याठिकाणी अंकुश राहिला नसल्याचा प्रत्यय असल्याने आश्चर्यव्यक्त करण्यात येत आहे. क्रीडा संकुलात साफ सफाई करण्यात येते. मात्र इतर सुविधा मिळत नसल्याची व्यथा संकुलातील काही गाळेधारकांनी बोलताना मांडली आहे. क्रीडा संकुलात वर्षभरात विविध सुविधा देण्यात येतील असे गाळा विकत घेताना सांगण्यात आले होते. महिला स्वच्छता गृहाची परिस्थिती देखील हलाकीची असल्याने तात्काळ सुधार करण्याची गरज आहे.

सीसीटीव्ही लावण्याची गरज
नागरिक आपल्या कामानिम्मिताने क्रीडा संकुलात येत असतात. शाळा, कॉलेज, महाविद्यालय याभागात असल्याने विद्यार्थ्याचा वर्दळीचा भाग आहे. अनेक घटना गेल्या काळात याठिकाणी घडल्या असून घटनेला जबाबदार असलेले नेहमी पळ काढण्यात यशस्वी होतात. यामुळे पोलिसांची नेहमी दमछाक होत असते. महिला महाविद्यालय असल्याने रोडरोमिओचा नेहमी याभागात वावर असतो. यामुळे सीसीटीव्ही केमेरा क्रीडा संकुलाच्या भागात लावल्यास मोठी मदत होणार आहे. पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेता येणार असून क्रीडा संकुलाकडे अधिकार्‍यानी लक्ष घालण्याची गरज आहे.

महिला स्वच्छता गृहाचीही अस्वच्छता

महिला स्वच्छता गृहाची अत्यंत वाईट परिस्थिती असून दरवाजे तुटून पडले आहेत. टवाळखोर नेहमी ह्याच भागात सिगारेट पिण्यासाठी स्वच्छता गृहाच्या ठिकाणी नेहमी आढळून येतात. यामुळे क्रीडा संकुलात महिलाच्या सुरक्षेविषयी धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी संकुलातील दुकानात काम करणार्‍या दोन महिला वर्कर्स स्वच्छता गृहात गेले असता अचानक काही टवाळखोर पाठलाग करून स्वच्छता गृहात शिरल्याने त्या दोन महिलाची धावपळ उडाली. आरडाओरड केल्या नंतर नागरिक मदतीला धावून आले. मात्र तोपर्यत टवाळखोर घटना स्थळावरून पसार झाले होते. मोठा अनर्थ याठिकाणी घडण्याची शक्यता होती. मात्र वेळेवर प्रसंगवधान राखून महिलांनी दक्षता बाळगली.अशा प्रकारे घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही केमेरे लावण्याची गरज असून यामुळे नेमके गुन्हेगार कोण याचा पर्दाफाश होणार आहे.