शहापूर । शहापूर तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी खर्डी येेेथील महसूल विभागाची जागा 2015 मध्ये निश्चित होऊनही क्रीडा समितीकडे दोन वर्षानंतरही वर्ग झाली नाही. परिणामी सरकार याबाबत चालढकल करीत असल्याचा गंभीर आरोप आमदार पांंडूरंग बरोरा यांनी केला आहे. आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर तालुका आदिवासी तालुका असल्याने तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रांत चांगले नैपुण्य दाखविले आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जून 2015 मध्ये क्रीडा संकुलाची कल्पना आमदार बरोरा यांनी मांडली. त्यानंतर क्रीडा समिती तयार होऊन जागेचा शोध सुरू करण्यात आला.
आमदार पांडूरंग बरोरा यांची सूचना
तालुक्यातील खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयासमोरच असलेली 27 हेक्टर इतकी महसुल विभागाची जागा राष्ट्रीय महामार्ग आणि खर्डी रेल्वे स्टेशनजवळच असल्याने व ती टेबल लँड असल्याने पाहणी होऊन तिला पसंती देण्यात आली. त्यापैकी 15 एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली. मात्र ह्या जागेची म्हाडानेही मागणी केली होती. त्यानुसार सर्व अहवाल पाहता 7 ते 8 एकर जागा महसूल विभागाची असल्याने ती सहजपणे क्रीडा समितीकडे वर्ग होईल अशी अपेक्षा होती. ती वर्ग न झाल्याने पावसाळी अधिवेशनात आमदार बरोरा यांनी कपात सूचना मांडली होती.
राज्य सरकारकडून दुर्लक्ष
क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून आमदार बरोरा यांना पत्राद्वारे उत्तर आले असून ही जागा देण्याबाबतचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्त यांनी हा प्रस्ताव प्रधान सचिव, महसूल, मंत्रालय मुंबई-4 यांच्याकडे 2 जानेवारी 2017 ला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. एवढ्या महत्वाच्या बाबतीत मंत्रालयात 10 महिन्यांत निर्णय होत नाही, तर सामान्य नागरिकांच्या फायलींचे काय असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. तर ह्या क्रीडा संकुलाला सरकार जागा देण्याबाबत चालढकल करीत आहे असा आरोप आमदार बरोरा यांनी केला आहे.