क्रीडा समितीचे सभापती ट्रॅक्टरवरून आले महापालिकेत!

0

सरकारी वाहनावर चालक नसल्याने झाला होता नाईलाज

पिंपरी-चिंचवड : चार दिवसांपासून महापालिकेच्या मोटारीवर चालक नाही. याबाबत महापालिका प्रशासनाला कल्पना देऊनही चालक देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे संतापलेले क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते हे गुरुवारी चक्क ट्रॅक्टर घेऊन महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. त्यांनी अनोख्या पद्धतीने महापालिका प्रशासनाचा निषेध केला. या प्रकाराची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, मध्यंतरी महापौर नितीन काळजे यांनाही त्यांची शासकीय मोटार रस्त्यातच बंद पडल्याने महापालिकेत येता आले नव्हते. वारंवार मागणी करुनही दुसरी चांगली मोटार उपलब्ध करून दिली जात नसल्याने महापौरांनी स्वत:ची मोटार वापरण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता सस्ते यांना प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका सहन करावा लागला.

प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांना महापालिकेकडून सरकारी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा चालक गेल्या चार दिवसांपासून आजारी आहे. याबाबाबत त्यांनी प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करून दुसरा चालक मोटारीवर देण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी त्यांना रिक्षातून महापालिकेत यावे लागले होते. प्रशासन चालक देण्यास टाळाटाळ करत होते. याच्या निषेधार्थ सस्ते गुरुवारी महापालिकेत ट्रॅक्टर घेऊन आले. त्यांनी ट्रॅक्टरच्या समोरील बाजूस आपले नाव, क्रीडा समिती असा फलकदेखील लावला होता. ट्रॅक्टर घेऊन महापालिकेत आल्यानंतर प्रशासनाने दुसरा चालक दिला आहे.