पिंपरीतील व्यायामशाळेचा हॉल भाड्याने देण्याचा प्रस्ताव फेटाळला
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या स्थायी समितीने शहर सुधारणा समिती पाठोपाठ क्रीडा समितीला दणका दिला आहे. क्रीडा समितीमार्फत आलेला पिंपरी गावातील कापसे व्यायामशाळेवरील हॉल दिनेस डान्स फॅक्टरी या सामाजिक संस्थेला भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला आहे. संस्थेला 11 महिने 2500 रुपयांप्रमाणे भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा, प्रस्ताव क्रीडा समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत केला होता. स्थायी समितीमध्ये या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
सर्वच पालिकेचे, पुन्हा चालकास पैसे द्यायचे
व्यायामशाळा पालिकेची, साहित्य पालिकेचे आणि ती व्यायामशाळा चालविणार्यास पुन्हा पैसे द्यायचे, हे चुकीचे आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर व्यायाम शाळांबाबत नवीन धोरण तयार करणार आहेत, असे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. दरम्यान, स्थायी समितीने शहर सुधारणा समितीमार्फत आलेला मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातीतील तरूणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याकामी संस्था नियुक्त करण्याचा प्रस्ताव देखील फेटाळला होता. निविदा प्रक्रिया राबवा, निविदांमध्ये स्पर्धा झाल्यावरच संस्थेची नेमणूक करा, अशा सूचनाही स्थायी समितीने दिल्या होत्या. त्यापाठोपाठ आता क्रीडा समितीचा प्रस्ताव देखील फेटाळला आहे.
क्रीडाचा विषय पुन्हा तहकूब
दरम्यान, स्थायी समिती क्रीडा समितीचे विषय तहकूब ठेवत असल्याचे कारण देत क्रीडा समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. नेत्यांनी समजाविल्यानंतर त्यांनी माघार घेतली. तसेच क्रीडा समितीला काहीच अधिकार नाहीत. क्रीडा समितीचे विषय स्थायी समिती सभेत परस्पर बदलले जातात. त्याची क्रीडा समितीला कोणतीही कल्पना दिली जात नाही. विश्वासात घेतले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला होता.