क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे खिलाडूवृत्तीला चालना : महाडिक

0

लोणी काळभोर । विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांच्यातील खिलाडूवृत्तीला चालना मिळण्यासाठी शासकीय पातळीवर आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत हवेली पंचायत समिती सभापती वैशाली महाडिक यांनी व्यक्त केले. लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये आयोजित ‘यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सव 2017-18’चा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला.

सरपंच वंदना काळभोर, उपसभापती अजिंक्य घुले, सुनंदा शेलार, अर्चना कामठे, कावेरी कुंजीर, हेमलता बडेकर, रोहिणी राऊत, युगंधर काळभोर, अनिल टिळेकर, ज्योती परिहार, ज्ञानदेव खोसे, प्राचार्य एस. एम. गवळी, अशोक ससाणे, भरत इंदलकर यांच्यासह तालुक्यातील शाळांचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. केंद्र व बीट स्तरावर झालेल्या क्रीडा स्पर्धातून निवड झालेल्या विद्यार्थांची तालुका स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

यावेळी महाडिक म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. जिल्हास्तर, तालुकास्तर अशा विविध पातळीवर होणार्‍या या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आलेल्या खिलाडूवृत्तीला चालना मिळते. स्पर्धेदरम्यान खेळाडूंची विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे. खेळताना विद्यार्थ्यांना दुखापत झाल्यास पंचायत समितीच्या अधिकार्‍यांसह केंद्रप्रमुख, क्रीडा शिक्षकांनी खेळाडूंची काळजी घ्यावी. युगंधर काळभोर यांनी आभार मानले.