चार जण गंभीर जखमी : चोपड्याजवळ विचीत्र अपघात
चोपडा/अडावद – तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर समोरून येणार्या मोटर सायकलला चुकवितांना मोठा अपघात होऊन क्रूझर गाडी कडुलिंबाच्या झाडावर आदळली. यात श्रावण (अनिल) विठ्ठल सोनवणे (रा. वढोदा ता. यावल) हे जागीच ठार झाले. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले.
चोपडा तालुक्यातील मंगरूळ फाट्याजवळ चोपडा-यावल रस्त्यावर समोरून क्रुझर क्र. एमएच १९ एपी ४९५६ येत होती. अचानक समोर आलेल्या दुचाकी क्र. एमएच १९ बी. डी. ७१३४ हिला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रुझर गाडी झाडावर जाऊन आदळली. तर दुचाकीही रस्त्याच्या कडेला स्लीप झाली. त्यामुळे दुचाकीस्वारही या अपघातात जखमी झाला आहे.
जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणेंची भेट
या विचीत्र अपघातात क्रुझरमधील अनिल विठ्ठल सोनवणे (वय ४५ रा. वढोदा ता. यावल) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते मयत झाले असुन माधुरी रविंद्र बाविस्कर, दुर्गादास सोनवणे, सुमनबाई सोनवणे, प्रभाकर कोळी हे जखमी झाले. जखमी प्रभाकर कोळी व माधुरी बाविस्कर यांना उपचारसाठी जळगाव येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुर्गादास सोनवणे व सुमनबाई सोनवणे यांच्यावर चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. पंकज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चोपडा पोलीसात नोंद करून गुन्हा अडावद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेसचे जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी तातडीने रूग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातातील श्रावण (अनिल) सोनवणे हे त्यांचे पुतणे असल्याचे समजते.