जळगाव । कृषि उत्पन्न बाजार समितीत मालवाहू रिक्षातून टमाटे आणि भाजीपाला लिलावासाठी घेवून जात असलेल्या तरूण शेतकर्याचा शिवाजीनगर उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला क्रॉसबारचा फटका डोक्याला बसून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना आज शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास घडली. महेंद्र निंबा धनगर (वय-21 रा.किनोद करंज) असे मयत तरूणाचे नाव आहे. सकाळी तरूणाच्या मृतदेहावर शवविच्छेदर करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र हा किनोद करंज येथे आई-वडील भाऊसोबत राहत होता. महेंद्र हा शेती काम करत असल्याने शेतातून भाजीपाला तसेच टमोट विक्रीसाठी काढले होते. त्यामुळे शनिवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास मेहेंद्र याने भाजीपाला व टमाटे योगराज आत्माराम पाटील यांच्या मालवाहतूक रिक्षा (क्र. एमएच 19 एस 9742) मध्ये भरून किनोद करंज येथून बाजार समितीसाठी निघाले. यावेळी महेंद्र हा रिक्षाचा टपावर (कॅबिन) वर बसला होता. पहाटे 5.30 वाजता कानळदा रोडने जळगावला येत असतांना शिवाजीनगर येथील उड्डाणपुलावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे लावण्यात आलेल्या क्रॉसबारचा जोरदार फटका महेंद्रला लागून तो रिक्षाच्या टपावरून खाली कोसळला.
दोन तास मृत्यूशी झुंज
क्रॉसबारचा फटका बसल्यानंतर महेंद्र रिक्षाच्या खाली पडल्याचे रिक्षाचालक योगराज पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी महेंद्रला रक्तबंबाळ अवस्थेत उचलून त्याला रिक्षात बसवत जिल्हा सामान्य रूग्णालय गाठले. यानंतर त्याला उपचारार्थ दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकार्यांकरून त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र, दोन तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान महेंद्रचा मृत्यू झाला. महेंद्रचा अपघात झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी देखील जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.
रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
महेंद्रच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यानंतर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रईस शेख यांनी नातेवाईकांचे तसेच रिक्षा चालकाचा जबाब नोंदवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहावर डॉ. सुतार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केलेली होती. तसेच याप्रकरणी डॉ. सुतार यांच्या खबरीवरुन शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. महेंद्रच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ संदिप असा परीवार आहे. तर कल्पना आणि मनिषा ह्या दोन बहिणी असून त्यांची लग्न झालेली आहेत. दरम्यान, महेंद्रच्या मृत्युने गावात शोककळा पसरली आहे. तसेच महेंद्र याचे वडील व भाऊ हे देखील शेती करतात. परंतू शनिवारी लहान मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्यांना धक्काच बसला.
अवजड वाहतूक बंदीसाठी बसविला क्रॉसबार
रेल्वे विभागाने याबाबत महापालिकेला हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक असल्याचे पत्र दिले आहे. या पुलावरुन देखील शिवाजी नगर व त्या भागातील गावांना जाण्यासाठी मोठ्याप्रमाणात वाहतुक करण्यात येते. जो पर्यंत उड्डाण पुलाचे काम होत नाही तो पर्यंत या पुलावरील अवजड वाहतुक क्रॉसबार बसवून बंद करण्यात आली. क्रॉसबार बसविल्यानंतर अवजड वाहनांकडून अनेकदा धडक देण्यात आली. यामुळे क्रॉसबार अगदी खिळखिळा झाला होता. एका वाहनाने धडक दिल्याने तो तुटला त्यानतंर रेल्वे प्रशासानाकडून हा क्रॉसबार बसविण्यात आला आहे. खरे म्हणजे या पुलाची नव्याने उभारणी करण्याची गरज असतांना देखिल क्रॉसबार बसवून काम सुरु आहे.