अबुधाबी । पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने दुसर्या सत्रात फ्री कीकद्वारे केलेल्या गोलामुळे रेआल माद्रिदने अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत ग्रॅमियो संघाचा 1-0 असा पराभव करत क्लब विश्वचषक आपल्याकडे कायम राखला. रेआल माद्रिदचे 2017 मधील हे पाचवे विजेतेपद आहे.या विजयामुळे चार वर्षात तिसर्या कल्ब विश्वचषक जिंकणार्या रेआल माद्रिदने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आणि कट्टर हाडवैरी असलेल्या बार्सिलोना संघाच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. फ्रांसचा माजी अष्टपैलू फुटबॉलपटू झिनेदिन झिदान मार्गदर्शक असलेल्या रेआल माद्रिदने यावर्षी ला लीगा, चॅम्पियन्स लीग, युएएफ सुपर कप आणि स्पॅनिश सुपर कप स्पर्धा जिंकली आहे. सामन्याच्या मध्यंतरानंतर 8 व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रि कीकवर रोनाल्डोने केलेला हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. या विजयानंतर रोनाल्डो म्हणाला की, रेआल माद्रिदने एका वर्षात पाच स्पर्धा कधीच जिंकल्या नव्हत्या. त्यामुळे ही स्पर्धा आम्हाला जिंकायचीच होती.
रेआल माद्रिदमधून निवृत्त व्हायच आहे
क्ल्ब विश्वचषक जिंकल्यानंतर रोनाल्डो म्हणाला की, स्पेनमधील या आघाडीच्या क्लबमधूनच मला कारकिर्दीची अखेर करायची आहे. स्पर्धेत सात गोल करणारा रोनाल्डो म्हणाला की, मला कल्बमधूनच निवृत्त व्हायचे आहे. पण हे माझ्या हातात नाही. मैदानात चांगला खेळ करणे एवढेच माझ्या हातात आहे. मी क्लब चालवत नाही. कल्बच्या संचालकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी चांगला खेळतोय. इतर गोष्टींवर माझे नियंत्रण नाही. 32 वर्षीय रोनाल्डोने एक वर्षापूर्वीच रेआल माद्रिदसह करार केला आहे.
हा करार 2021 पर्यंतचा आहे.