क्लीन-अप गाड्यांच्या बेकायदा पार्किंगमुळे भांडुपकर नागरिक हैराण !

0

मुंबई (अविनाश हजारे) : रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या क्लीन-अप च्या गाड्यांमुळे गेली अनेक दिवसांपासून भांडुपकर नागरिक हैराण झाले आहेत. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक कोंडीत या गाड्या आणखीनच भर घालत असून, यातील दुर्गंधीमुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना श्वास रोखून ये-जा करावी लागत आहे.

भांडुप येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर काका पेट्रोलपंप ते ईश्वरनगर या परिसरात महापालिकेच्या क्लीन-अपच्या गाड्या मुख्य रस्त्यावरच उभ्या केल्या जातात , एकाच वेळेला ८ ते १० गाड्या दुतर्फा येथे उभ्या असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असल्याने गंभीर अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथे जवळच लहान मुलांच्या शाळा असून त्यांनाही या अरुंद रस्त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

भांडुपच्या लालबहादूर शास्त्री मार्गावर घनकचरा व्यवस्थापन विभागाची चौकी आहे, येथे क्लीन-अपच्या गाड्या लोड करण्याचे काम केले जाते . येथेच या गाड्या उभ्या असतात. विशेष म्हणजे डबल लेन पार्किंग द्रुतगती मार्गावर मज्जाव असतानाही येथे क्लीन-अपच्या गाड्या पार्क केल्यामुळे वाहनचालकांनाही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.क्लीन-अपच्या गाड्या तेथून निघताना अगदी सुसाट वेगाने निघतात त्यामुळे अनेकदा अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या बेकायदा पार्क केलेल्या गाड्या इतरत्र हलवून जागा मोकळी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत

” शाळा सुटल्यानंतर या मार्गावरून मुलांना नेणे त्रासदायक व धोकादायक बनले आहे. या पार्किंग मुळे ये-जा करणे जिकरीचे व अडथळा ठरत आहे. त्यामुळे पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ”
– शुभांगी परब( त्रस्त नागरिक)