धुळे । चालू शैक्षणिक वर्षाला सुरुवात होवून अवघे तीनच दिवस झाले आहे. तरीही शालेय वाहतूक करणार्या वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढली आहे. त्या अनुषंगाने परिवहन विभागानेही ओरड होण्याआधी तपासणीची कारवाई सुरु केली आहे. प्रादेशिक वाहन निरिक्षक अतुल चव्हाण यांच्या पथकाने केलेल्या अशाच एका तपासणी मोहिमेत तीन वाहने सदोष आढळून आल्याने ती ताब्यात घेत पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली. शिवाय त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
तीन वाहने जप्त
शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी रिक्षाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र रिक्षात मर्यादीत विद्यार्थी वाहतूक करता येत असल्याने अनेक रिक्षाचालकांनी थ्री व्हिलर ऐवजी चारचाकी वाहनाचा उपयोग सुरु केला आहे. अशाच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या एमएच 18/एजी 1033, एमएच 21/व्ही 3188 आणि एमएच 18/एजी 8289 या चारचाकी वाहनांची तपासणी वाहन निरिक्षक अतुल चव्हाण यांच्या पथकाने केली. या तपासणीत ही तिन्ही वाहने ताब्यात घेवून देवपूर पोलीस ठाण्यात जमा केली. शिवाय चालक मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.