क्षमा हिच बौध्द धर्माची शिकवण

0

भुसावळ । आपल्या सर्वांचा स्वभाव हा मातीवर रेषा ओढण्यासारखा पाहिजे परंतु भगवान गौतम बुध्द यांचा स्वभाव पाण्यावर रेषा ओढण्यासारखा आहे म्हणजेच पाण्यावर रेषा ओेढता येत नाही. याचाच अर्थ कितीही अपमान झाला तरी तो सहन करणे हेच बौध्द धर्म शिकवितो. मनाला दिशा लावण्याचे काम चित्त ठिकाणावर ठेवणे हे बौध्द धर्म शिकवितो. क्षमा मागणे आणि क्षमा करणे ही बौध्द धर्माची शिकवण आहे, असे प्रतिपादन चंद्रवीर यांनी केले. येथील नाहाटा महाविद्यालयात भूगोल शास्त्र मंडळातर्फे भूगोल सप्ताहांतर्गत शुक्रवार 20 रोजी भूगोल बौध्द धर्म आणि सामाजिक सलोखा या विषयावर धम्मचारी चंद्रवीर यांचे व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. बी.एच. बर्‍हाटे, प्रा.डॉ. स्वाती नारखेडे, अर्जून इंधारे, डॉ. सुनिल झनके, शांताराम तायडे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. एम.आर. संदानशिव, प्रा. नयना पाटील, विभागप्रमुख प्रा. व्ही.पी. लढे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बुध्द धर्माला केले पुनर्जिवीत
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना धम्मचारी चंद्रवीर म्हणाले की, जगात बुध्दाचे स्थान आहे. म्हणूनच भारताची शान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बुध्द धर्माला पुनर्जिवीत केले. दोन संस्कृतीला जोडण्याचे काम बुध्द धर्म करतो. बौध्द धर्माचे सिध्दांत, त्यांची प्रमुख तत्वे आणि अविद्या, तृष्णा, द्वेष हे पंचशिल आहे. त्याचे उच्चाटन करण्याचे काम बौध्द धर्म करीत असल्याचे सांगितले.

प्राणायाम क्रमप्राप्त
आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य बर्‍हाटे यांनी सांगितले की, भगवान बुध्दांचे चरित्र अभ्यासणे म्हणजेच मन शुध्द करणे होय आणि मन शुध्द करायचे असेल तर प्राणायाम करणे क्रमप्राप्त आहे. आपली मानसिकता व आपल्या स्वास्थ्यासाठी विचारशक्ती प्रबळ करण्यासाठी प्राणायाम स्फुर्तीदायक आहे आणि या प्राणायामाचे खरे प्रणेते भगवान गौतम बुध्द असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा. अनिल हिवाळे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. अजय तायडे, प्रा. जया कोळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मिळते धर्मज्ञान
नाहाटा महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे देशातील विविध धर्मांची माहिती विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने तज्ञ व्यक्तिंची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्मासंबंधी महत्वपूर्ण माहिती अवगत होत आहे. शुक्रवारी झालेल्या व्याख्यानमालेत धम्मचारी चंद्रवीर यांनी बौध्द धर्मातील विविध विषयांवर यथोचित मार्गदर्शन करुन चर्चा घडवून आणली. सुत्रसंचालन राजश्री चौधरी, काजल सावकारे हिने केले तर प्रास्ताविक कविता पाटील आणि आभार नंदलाल घ्यार याने मानले.