दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
खडकी : क्षुल्लक कारणावरुन पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन दोघाजणांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पिस्तुल काढुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी दहा जणांविरुद्द गुन्हा दाखल केला असुन घटनेतील सर्व आरोपी फरार आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. गणेश सुंगत (वय 24 रा.खडकी बाजार) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी अश्विन उर्फ सोन्या बळीराम साठे उर्फ बिलाड, आण्या भिसे, प्रकाश आवळे, निलेश उर्फ सोनु नेसमनी ( सर्व रा.खडकी बाजार) व इतर पाच ते सहाजणां विरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
जाब विचारला म्हणून केली शिवीगाळ
अर्जुन रोड, स्टेट बँक ऑफ इंडियासमोरील एका राजकीय पुढार्याच्या वाढदिवसानिमित्त फिर्यादी सुंगत व त्याचा मित्र विठ्ठल बिडलान हे रात्री 9.30 वाजता सदिच्छा देण्याकरिता जात होते. त्यावेळी त्यांच्या वस्तीत राहणारे आरोपी साठे उर्फ बिलाड भिसे व सर्वजण गेटमधुन बाहेर येत होते. त्यावेळी सुंगत याचा मित्र लखन परदेशी हा साठे यांच्या सोबत दिसला. तेव्हा बिडलान याने परदेशी यास, तु पण यांच्या सोबत फिरतो का, असे मस्करीने विचारले. त्याचा राग येऊन तसेच पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन साठे यांनी सुंगत व बिडलान यांस शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता साठे व त्याचे मित्र भिसे आवळे नेसमनी व इतर सहाजणांनी दोघांना लाथा बुक्क्यांंनी बेदम मारहाण केली. त्यानंतर साठे उर्फ बिलाड याने कमरेचे पिस्तुल काढुन ते लोड करुन सुंगत दिशेने रोखत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. सुंगत व बिडलान यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेची पोलिसांनी गंभिर दखल घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.