मुंबई : क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणातून एका 40 वर्षांच्या इसमाची हत्या झाल्याची घटना काल रात्री साकिनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद होताच चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मोबीन जावेद सुल्तान, जाहिद जावेद सुल्तान, सोहेब अजगरअली सिद्धीकी आणि मुजाहिद जावेद सुल्तान अशी या चौघांची नावे असून याच गुन्ह्यांत इतर सहा आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. या दहाजणांवर मुज्जमिल हसन शेख याची बेदम मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप आहे. साकिनाका येथील खैरानी रोडवरील यादव नगर, साईनाथ डेअरीसमोर ही घटना घडली.
रात्री मुज्जू हा त्याचा मित्र शाहिद, दिपक व इतरांसोबत आईस्क्रिम घेण्यासाठी आला होता. त्याने आईस्क्रिम खरेदी केल्यानंतर शॉपमध्ये काम करणार्या नरपतसिंग केशवसिंग राठोड याने त्याला पूर्वीच 125 रुपये बाकी असल्याचे सांगितले. या पैशांवरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी मुज्जमिल शेख आणि अब्दुल रफिक मोहम्मद शाह या दोघांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात दहाजणांच्या टोळीने या दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुज्जमिल याचा मृत्यू झाला.