क्षेत्रीय कार्यालयांना गडांची नावे देणे चुकीचे

0

चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महापालिकेला निवेदन

पिंपरी-चिंचवड : महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गडांची नावे देण्याची संकल्पना चुकीची आहे. गडाचे नाव देऊन गडांचा अपमान करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी किल्ले व गड जिंकलेले आहेत सर्व गड आणि किल्ल्यांचा इतिहास मोठा आहे. आपल्या महापालिकेने क्षेत्रिय कार्यालयांना गडांची नावे देणे म्हणजेच त्या गडांना ज्या शौर्याने जिंकले आहे त्याचा अपमान महापालिकेकडून होत आहे, अशा आशयाचे निवेदन चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीने महापालिकेला दिले आहे. भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी गडांची नावे देण्याचे सुचविले असून याला प्रशासनाने अनुकुलता नुकतीच दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे निवेदन दिले आहे.

गावांची नावे द्यावी
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही महापालिकेने क्षेत्रिय कार्यालयांना गडांची नावे दिलेली नाही, याचा आदर्श पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला पाहिजे. महापालिकेने दोन गावांची नावे एकत्रित करून आपल्या क्षेत्रिय कार्यालयाला द्यावी. उदाहरणार्थ सांगवी-दापोडी, कासारवाडी क्षेत्रिय कार्यालय, भोसरी क्षेत्रिय कार्यालय, चिंचवड क्षेत्रिय कार्यालय, आकुर्डी क्षेत्रिय कार्यालय, रहाटणी-पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर क्षेत्रिय कार्यालय. जेणेकरून त्या भागातील गावांची नावे जनतेच्या स्मरणात राहील. म्हणून आम्ही ही मागणी आपणाकडे करीत आहोत. पुणे महापालिकेने ज्या पद्धतीने क्षेत्रिय कार्यालयांना नावे दिलेली आहेत तीच पद्धत आपल्या महापालिकेने राबवावी. गडांची नावे महापालिकेने कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयाला देऊ नये, इतिहासाचा अपमान नावे करू नका, असेही निवेदनात म्हटले आहे.