प्रस्तावाला महासभेत मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार आता गड-किल्ल्यांच्या नावाने चालणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे पन्हाळगड, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे पुरंदर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंहगड, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे रायगड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदूर्ग आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड असे नामकरण होणार आहे. महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालयातील कामाकाजाकरीता सोयीचे पडण्यासाठी या कार्यालयांचे नव्याने नामकरण करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीमुळे या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त होत आहे. महाराजांचा इतिहास, गड-किल्ले यांना असा मान देणे कौतुकाची गोष्ट आहे.
क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती करून त्यांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यास सुरूवात केली. मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. त्यानुसार 32 निवडणूक प्रभाग झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
अ नाही पन्हाळगड क्षेत्रीय कार्यालय
ही नवीन आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2017 पासून अस्तित्वात आली आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना महापालिका प्रशासनाने कामकाजाच्या सोईसाठी ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ अशी नावे देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता या समित्या आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समित्या व क्षेत्रीय कार्यालयांना महाराष्ट्रातील विविध गड, किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. आतापर्यंत फक्त अ क्षेत्रीय कार्यालय म्हणले जात होते. आता ते पन्हाळगड क्षेत्रीय कार्यालय म्हणून ओळखले जाणार. बोलले जाणार.
त्यानुसार ’अ’ प्रभाग समिती व क्षेत्रीय कार्यालयाचे पन्हाळगड, ’ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे पुरंदर, ’क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंहगड, ’ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे रायगड, ’इ’ क्षेत्रीय कार्यालयाला शिवनेरी, ’फ’ क्षेत्रीय कार्यालयाला देवगिरी, ’ग’ क्षेत्रीय कार्यालयाला सिंधुदुर्ग आणि ’ह’ क्षेत्रीय कार्यालयाला प्रतापगड असे नामकरण होणार आहे. या नावांनीच महापालिकेच्या आठही प्रभाग समित्या व क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार चालणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत या प्रस्तावाला उपसूचनेद्वारे मान्यता दिली.