नवी दिल्ली । पाकिस्तानी सैन्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या घृणास्पद कृत्याचा भारतीय लष्कराने सोमवारी बदला घेतला. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकच्या सीमारेषेवरील चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याकडून या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचेही दिसत आहे.
या महिन्यात पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. 1 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा जोरदार मारा केला होता.
या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी पाकने शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. पाकच्या कृतीमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. शत्रूंच्या या अमानवी कृत्याला सडेतोड उत्तर देऊ, असा थेट इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला होता.