खंडणी पथक थेट कल्याण-डोंबिवली मनपात

0

कल्याण । बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेलेल्या कथित पत्रकार तथा आरटीआय कार्यकर्ती चारुशीला पाटील हिची पोलिसांची चौकशी केली. तेव्हा खंडणीप्रकरणी अनेक रथी-महारथींचे नावे बाहेर येऊ लागली आहेत. ठाणे खंडणी विरोधी पथकाने आज महापालिका मुख्यालयातील प्रेसरूममध्ये पाटील हिच्या लॉकरची तपासणी केली. तेव्हा अनेक दस्तऐवज व लाखोंचे चेक जप्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता कार्यालयातील खासगी सचिव व महापालिकेच्या शिपायाला बुधवारी ठाणे येथील खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाकुर्ली-चोळेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडून चारुशीला हिने 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यामध्ये तडजोड होऊन 25 लाख रुपये देण्याचे ठरले होते. यातील 2 लाख रुपये हे चारुशीला हिने आधी घेतले होते आणि उर्वरित 3 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचे 4 चेक स्वीकारताना ठाणे खंडणी विरोधी पथकाने रविवारी तिला अटक केली होती.

ब्लॅकमेल करणारे रॅकेट उघड होणार
दरम्यान खंडणीखोर चारुशीला हिच्या विरोधात असलेल्या पुराव्याच्या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे असून पोलीस त्यांनादेखील चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकारामुळे अनधिकृत बांधकामांवर ब्लॅकमेल करून गडगंज पैसा उकळणारे एक मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचेही बोलले जात आहे. महापालिका वर्तुळात खळबळ उडवून देणार्‍या या प्रकरणी डोन यांचे खासगी सचिव हमीद शेख यांना पत्रकारांनी संपर्क केला असता पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले असल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान गटनेता शाहीन डोन यांचे पती जवाद डोन यांना संपर्क केला असता हा क्रमांक बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

यानंतर आरोपी पाटीलला न्यायालयात हजर केल्यानंतर मिळालेल्या 3 दिवसांच्या कोठडीदरम्यान चारुशीला हिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या 2 दिवसांत आणखी खळबळ उडवून देणारी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता कार्यालयातून तिने अनेक तक्रार अर्ज केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच तक्रार सुरेंद्र पाटील व चारुशीला पाटील यांच्यातील देवाण-घेवणीच्या संदर्भातील संवाददेखील या ठिकाणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत मनसे गटनेता कार्यालय व उपमहापौर कार्यालय येथील लिपीक यांचीदेखील चौकशी होणार आहे. तसेच महापालिकेच्या शरद पाटील या प्रभाग क्षेत्र अधिकार्‍यासह इतरही काही प्रभाग क्षेत्र अधिकार्‍यांची, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त कार्यालय, नगररचना विभागातील अधिकारी यांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.