जळगाव। महानगरपालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या 18 मार्केटमधील 2,175 गाळे दोन महिन्यांत ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया सुरू करण्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. मात्र, याबाबत आदेशाची प्रत हातात आल्यावरच भूमिका घेणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
निकालाचा अभ्यास करुन निर्णय
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या अठरा व्यापारी संकुलातील 2,175 गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांत सुरू करून दोन महिन्यांत पूर्ण करावी. या प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करू नये, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. मंगेश पाटील यांच्या द्विपीठाने दिले आहेत. या गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. त्यामुळे हे गाळे ताब्यात घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाने आदेशात स्पष्टपणे पंधरा दिवसांत ही प्रकिया सुरू करण्याचे नमूद केले आहे. याबाबत प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. मात्र, खंडपीठाच्या आदेशाची प्रत अद्याप हातात आली नसल्याची माहीती प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी दिली. याबाबत आदेशाची प्रत हातात आल्यावर निकालात काय म्हटले आहे याचा अभ्यास करुनच भूमिका ठरविली जाणार असल्याची माहीती निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलातांना दिली.