पुणे : पुणे खंडपीठासाठी जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी करणार्या वकिलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नुसती आश्वासनांवर बोळवण केली. पुण्यातील खंडपीठासाठी मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करू, असे फडणवीस याप्रसंगी म्हणाले. शिवाजीनगर येथील न्यायालयात कुटुंब न्यायालयाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या प्रमुख अतिथी होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. खंडपीठाबाबत मुख्यमंत्री काही घोषणा करतील, अशी वकिलांना अपेक्षा होता. परंतु, भाषण संपत आले तरी मुख्यमंत्री काहीही बोलले नाही. त्यामुळे वकिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यावर आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.
कौटुंबीक न्यायालय चांगले चालावे…!
कौटुंबीक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्यायमूर्ती भूषण गवई, पालकमंत्री गिरीश बापट, कौटुंबीक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे, महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला गेल्यावर दुकान आधिक चालू दे असे सांगावे लागते. मात्र, आज कुटुंब न्यायालयाचे उद्घाटन करण्यास आलो असून, या न्यायालयातून अधिकाधिक केस निकाली लागल्या पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. पुणे शहरातील शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबीक न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ज्ञ, बाल मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष यांचा समावेश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
येणार्यांच्या जीवनात आनंद, आशा निर्माण करावी लागेल!
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. श्रीमती मंजुळा चेल्लूर यांनी जीवनात सुबत्ता असलेल्या व्यक्ती कौटुंबीक कलहामुळे त्रस्त असल्याची उदाहरणे देऊन कौटुंबीक न्यायालयांमध्ये येणार्या व्यक्तींच्या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणार्यांवर असल्याचे सांगितले. कौटुंबीक न्यायालय हे एक वेगळे आणि विशेष न्यायालय आहे. इथे येणार्या व्यक्तींबाबत सर्वांनी सहानुभूतीचा, आपुलकीचा दृष्टिकोन ठेवावयास हवा, असे आवाहन करुन त्या म्हणाल्या, आत्मविश्वास गमावलेल्या, नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनात शांतता निर्माण करण्याचे, त्यांचे जीवन घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपल्याला करावयाचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही कौटुंबीक न्यायालयाच्या स्थापनेचा उद्देश सांगून विभक्त झालेले आणि घटस्फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्यायालयात आलेली जोडपी आपल्या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा आशावाद व्यक्त केला.