खंडपीठासाठी पालिकेने 25 एकर जागा द्यावी

0

पुणे । नागरिकांचे हित लक्षात घेऊन उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे शहरात व्हावे यासाठी पालिकेने 25 एकर जागा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला असून येत्या मंगळवारी होणार्‍या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी हा प्रस्ताव दिला होता.शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसल्याने अनेक नागरिकांना उच्च न्यायालयाच्या कामकाजाकरीता मुंबईत जावे लागते. त्यातच शहरातील हजारो नागरिकांचे दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच पुणे बार असोसिएशन सुध्दा हे खंडपीठ पुणे येथे व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.

लवकर न्याय मिळण्यास मदत
हे खंडपीठ झाल्यास नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच नागरिकांना जलद न्याय मिळण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन खंडपीठासाठी एक पाऊल पुढे टाकत महापालिकेने 25 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मात्र, शहरात महापालिकेकडे एवढी जागा उपलब्ध नसल्याने तसेच जागा द्यायची झाल्यास ती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून द्यावी लागणार असल्याने स्थायी समिती या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.