खंडपीठासाठी बार असोसिएशनचे आमदारांना साकडे

0

पिंपरी-चिंचवड : पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे, यासाठी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आमदार जगताप यांनी बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. पुण्यात खंडपीठ व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व वकील संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. पुणे बार असोसिएशनने पुढाकार घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून ही मागणी लावून धरली आहे.

मागणीचे निवेदन केले सादर
पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपळे गुरव येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन पुण्यातील खंडपीठासाठी आपण सरकारकडे आग्रही रहावे, अशी विनंती केली. त्यासाठी आवश्यक बाबी सरकारच्या कानावर घालून बर्‍याच वर्षांपासून ही प्रलंबित मागणी पूर्ण करावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार जगताप यांना देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत झंजाड, अ‍ॅड. संतोष जाधव, सचिव अ‍ॅड. विवेक भरगुडे, सदस्य अ‍ॅड. अमित खोत, अ‍ॅड. मकरंद औरंगाबादकर, अ‍ॅड. कीर्तीकुमार गुजर, अ‍ॅड. औदुंबर खुणे-पाटील, अ‍ॅड. संजय दळवी, अ‍ॅड. विजय सावंत, अ‍ॅड. अजित जाधव, अ‍ॅड. आतिश लांडगे, अ‍ॅड. गिरधरी आगरवाल आदींचा समावेश होता.