जळगाव । नाशिक येथे मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याची बतावणी करून दोन ते तीन भामट्यांनी शहरातील तीन दुकानदारांना बनावट डीडी देऊन 2015 मध्ये लाखो रुपयांचा गंडा घातला होता. शहर पोलिसांनी एका भामट्याला रविवारी अटक केली होती. त्याच्या चौकशीत पोलिसांना भामट्यांनी अहमदाबाद, खंडवा यानंतर भुसावळातही व्यावसायिक असल्याची बतावणी करून हजारोंचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. तर अटक करण्यात आलेल्या भामट्याच्या साथीदारांच्या शोधार्थ पथक अहमदाबाद येथे रवाना होणार आहे.
अशी होती फसवणूक करण्याची पद्धत…
साहित्याचे नमूने घेऊन गेल्यानंतर दोन दिवसांनी भामट्यांचा फोन तिनही दुकानदारांना आला. त्यांनी माणूस पाठवितो. त्याच्या सोबत बँकेचा डिडि आणि सामानाची यादी पाठवतो. त्या नुसार साहित्य पाठवावे असे सांगितले. त्यानंतर तिनही भामटे शहरात आले. त्यांनी एक मालवाहू रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाकडे डिडि देऊन साहित्य घेऊन येण्यास सांगितले. रिक्षा वाल्याने डिडि देऊन आणलेले साहित्य एका ठिकाणी पिकअप व्हॅनमध्ये ठेवून भामट्यांनी पोबारा केला. दुकानदारांनी बँकेत डिडि टाकल्यानंतर बनावट असल्याचे समोर आले.
19 डिसेंबर 2016 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे अशाच पद्धतीची फसवणूक केलेल्या एका संशयिताला अटक केल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून तपासासाठी शहर पोलिस हे खंडवा येथे गेले होते. खंडवा पोलिसांनी संशयित प्रफुल्ल जैन याला अटक केली होती. खंडवा पोलिसांच्या ताब्यातून प्रफुल्ल जैन याला ताब्यात घेवून पथक जळगावात परतले. यानंतर त्यांना 8 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात होती. आज त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची न्या. पाटील यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
साथीदारांच्या शोधार्थ पथक
शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक गंधाले हे संशयिताला घेवून मुंबईकडे त्याच्या साथीदारांच्या शोधार्थ गेले होते. परंतू भामट्यांचे नाव व पत्ताही चुकीचा असल्याचे तपासात आढळून आले. यानंतर पथकाने सिडीकेट बँकेला भेट दिली तसेच तेथून या प्रकरणाविषयी जी माहिती मिळले ती घेतली. यातच बँकेने सर्व शाखांना बनावट डी.डी वरील नंबर मेलद्वारे पाठविण्यात आले असून असा डी.डी. बँकेत आल्यास तो स्विकारू नका व त्याबाबत माहिती बँकेस द्या अशी माहिती देण्यात आली आहे, अशी माहित गंधाले यांच्या पथकाला मिळाली. यातच या भामट्यांनी खंडवासह अहमदाबाद तसेच भुसावळातही बनावट डी.डी देवून दुकानदारांना गंडा घातल्याचेही समोर आले. दरम्यान, इतर भामट्यांच्या शोधार्थ पथक अहमदाबाद येथे रवाना होणार आहे.