खंडव्यात दोन कोटींच्या रोकडसह दोघा आरोपींना पकडले

0

रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची पवन एक्स्प्रेसमध्ये संयुक्त कारवाई : ठाण्यातील उद्योजकाला फसवत पळणार्‍या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

भुसावळ : ठाण्यातील उद्योजकाला कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली दोन कोटींमध्ये गंडवत बिहारकडे पळणार्‍या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात खंडवा लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला बुधवारी रात्री यश आले आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून गुरुवारी सकाळी त्यांना ठाणे क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आतापर्यंतची ही रेल्वे सुरक्षा बलाची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विनोद झा व अमित यादव (दोन्ही रा.दरभंगा, बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कर्जाचे आमिष देत दोन कोटीत गंडवले
विनोद झा व अमित यादव (दोन्ही रा.दरभंगा, बिहार) या आरोपींनी ठाण्यातील एका उद्योजकाला कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत त्यापोटी दोन कोटी उकळले होते मात्र आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर या उद्योजकाने ठाणे नगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवल्यानंतर भादंवि 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा ठाणे क्राईम ब्राँच युनिट एककडे तपासासाठी वर्ग करण्यात आला व वरीष्ठ पोलिस नितीन ठाकरे यांनी आरोपींच्या शोधार्थ तपासचक्रे गतिमान केली.

आरोपी निष्पन्न होताच आवळल्या खंडव्यात मुसक्या
ठाणे क्राईम ब्रँचने भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएससी बी.पी.कुशवाह व डीएससी क्षितीज गुरव यांना आरोपी पवन एक्स्प्रेसने पळून जात असल्याबाबत त्यांच्या छायाचित्रासह बुधवारी सायंकाळी माहिती कळवली होती मात्र तो पर्यंत गाडीने भुसावळ सोडल्याने गाडीत गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला आरोपींबाबत वर्णन कळवले होते. गस्ती पथकाने संपूर्ण गाडीची तपासणी केल्यानंतर आरोपी ए- 1 कोचमधून प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खंडवा लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला सूचित करण्यात आले तसेच गस्ती पथकाला आरोपींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. खंडवा रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास गाडी आल्यानंतर खंडवा लोहमार्ग पोलिसांचे निरीक्षक हेमंत श्रीवास्तव व खंडवा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक महेंद्रकुमार खोजा यांनी संयुक्त कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींजवळ असलेल्या बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात दोन कोटींची रोकड आढळल्याने रोकडसह आरोपींना खंडवा लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

क्राईम ब्राँचने गुरुवारी घेतला आरोपींचा ताबा
ठाणे क्राईम बँचचे उपनिरीक्षक सरक, राहुल राठोड यांच्यासह पथकाने खंडवा गाठून खंडवा लोहमार्ग पोलिसांकडून दोघा आरोपींचा ताबा घेतल्याचे आरपीएफ निरीक्षक खोजा यांनी सांगितले. खंडवा न्यायालयातून ट्रान्सपर वॉरंटच्या आधारे आरोपींना ठाण्यात नेण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल व खंडवा लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.